मुंबई - राज्यातील हजारो शिक्षकांच्या सेवा कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी अधिग्रहित केल्या आहेत. अशात सर्व शिक्षकांचे लसीकरण तातडीने करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे. मात्र, यावर राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना तत्काळ लसीकरण करण्याची मागणी भाजपा शिक्षण आघाडीकडून करण्यात आलेली आहे.
शिक्षकांचे लसीकरण गरजेचे
सर्व शिक्षकांचे लसीकरण तातडीने करण्याच्या मागणीबाबतचे पत्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले आहे. असे भाजपा शिक्षण आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले. राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षकांना विलगीकरण कक्ष, सर्वेक्षण, चेक पोस्ट व अन्य ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. अशा ठिकाणी कोरोना संसर्गाची शक्यता अधिक असते. यामुळे शिक्षकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अशा शिक्षकांचे संपूर्ण लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यात लसीकरण आरोग्यसेतू व अन्य नोंदणी सक्तीची केली, तसेच नोंदणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने काही अडचणींमुळे अनेक शिक्षक नोंदणीपासून वंचित आहे. त्यामुळे शिक्षकांना नोंदणी सक्तीची न करता त्यांना ऑफलाईनची मुभा द्यावी. तसेच अशा सूचना राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी विनंती यामध्ये करण्यात आली आहे.
शिक्षकांना विमा कवच द्या
विनाअनुदानित आणि अंशत; अनुदानित, तसेच सेल फायनान्स शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवा कोरोना प्रतिबंधक कामासाठी अधिग्रहित करायची असेल, तर शासनाने या शाळांमधील शिक्षकांना 50 लाखाचे विमा कवच, तसेच विमा संरक्षण योजना लागू करावी अशी मागणी, अनिल बोरनारे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा - 'गारुडी आणि पुंगीवाले सत्तेच्या टोपल्यांवर बसून पुंग्या वाजवीत आहेत'