मुंबई - उत्तर मुंबई लोकसभेची उमेदवारी मिळाल्यापासून उर्मिलाने नागरिक आणि कार्यकर्ते यांच्या भेटी गाठी घेण्याचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे सुरू केला आहे. विशेष म्हणजे बुधवारी संध्याकाळी गोराई परिसरात गृहनिर्माण संस्थांना भेट देत असताना उर्मिलाने त्याच परिसरात राहत असलेल्या तिच्या चुलत भावाच्या घरी पहिल्यांदा भेट दिली.
अभिनेत्री आणि काँग्रेस उमेदवार असलेली उर्मिला पहिल्यांदाच घरी आल्याने तिच्या वहिनीनेही उत्साहात उर्मिलाचे स्वागत केले. यानंतर तिचे आणि तिच्या नवऱ्याला मराठी पध्दतीने औक्षण करत उर्मिलाला साडी चोळी भेट दिली. यासोबतच उर्मिला व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. त्यामुळे, तिने या मतदारसंघातून निवडून यावं, अशी आमची इच्छा असल्याचे वहिनी शामल मातोंडकर यांनी म्हटले आहे.