मुंबई - बॉलिवूडची 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर ही राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेतल्यापासून बरीच चर्चेत आहे. काँग्रेसकडुन उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राची उमेदवारीही तिला जाहीर झाली आहे. अभिनयाकडुन राजकारणाकडे वळलेल्या उर्मिलाची संपत्तीही कोटींच्या घरात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञपत्रात तिने संपत्तीची माहिती दिली आहे.
उर्मिला मातोंडकरकडे एकूण ४३ कोटी ९३ लाख ४६ हजार ४७४ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर तिचा पती मीर यांच्याकडे ३२ लाख ३५ हजार ७५२ रुपयांची मालमत्ता आहे. याशिवाय तिच्याकडे ६६ लाख ७४ हजार ५९१ रुपये किंमतीची मर्सिडीज E२२०D आणि आय २० अक्टिव्ह मनगा ही ७ लाख २४ हजार ७९९ रुपये किंमतीची गाडी आहे. तिची स्थावर मालमत्ता ७ कोटी ४८ लाख ३५ हजार ४६२ रुपये तर तिच्या पतीच्या नावे २२ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे.
उर्मिलाच्या मालकीची वांद्रे येथे २ तर अंधेरी येथे १ असे एकूण ३ निवासी घर आहेत. तर अंधेरी लिंक रोड परिसरात २ कोटी १३ लाख किंमतीची व्यावसायिक जागा आहे. मात्र, व्यावसायिक असलेल्या उर्मिलाच्या पतीच्या मालकीचा मीरा भाईंदर परिसरात ३० लाख रुपये किंमतीचे एक घर आहे.
वसई येथे उर्मिलाच्या मालकीची ४ एकर शेती जमीन असून त्याची मार्केटनुसार किंमत ५५ लाख रुपये इतकी आहे. अलेवाडी तालुक्यात ५ एकर शेतजमीन असून त्याची किंमत १ कोटी १३ लाख रुपये आहे.