मुंबई - कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राप्रमाणे आता मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनाही बसला आहे. मुंबईतील शाळा, महाविद्यालये बंद असून, खासगी कार्यालये अंशतः बंद आहेत. तर सरकारी कार्यालयात उपस्थिती कमी आहे. त्यामुळे याचा डबेवाल्यांच्या सेवेवर 50 टक्क्यांनी परिणाम झाला आहे. त्यातच प्रादुर्भाव कमी होत नसल्याने अखेर डबेवाल्यांनी आपली सेवा 20 मार्च ते 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील चाकरमान्यांना घरचं जेवण पोहोचवण्याचं काम वर्षानुवर्षे डबेवाले करत आहेत. ऊन, वारा, पाऊस, वादळ वा कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत डबेवाले आपली सेवा अविरत चालू ठेवतात. पण आता मात्र नाईलाजाने ही सेवा काही दिवस बंद ठेवण्याची वेळ डबेवाल्यांवर आली आहे.
गर्दीच्या लोकलमधून प्रवास करत डबेवाले आपली सेवा देतात. अशावेळी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मास्क लावणे, हात धुवणे आणि सॅनिटाझर्सचा वापर ते करत आहेत. पण कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यातच डबे घेणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. तेव्हा डबेवाल्यांच्या सुरक्षीततेचा विचार करत सेवा 10 दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. मुंबईतील फूड स्टॉल, हॉटेल काही प्रमाणात बंद असून, येत्या काळात तेही पूर्णतः बंद होण्याची शक्यता आहे.
अशात डबेवाल्यांची सेवा बंद झाल्याने तर जे काही चाकरमानी कामावर येत आहेत. त्यांच्या पोटाचे हाल होण्याची शक्यता आहे. 1 एप्रिलपासून ही सेवा पूर्ववत होईल, असेही तळेकर यांनी सांगितले. मात्र, 31 मार्चनंतर ही परिस्थिती अशीच राहिली तर सेवा आणखी काही काळ बंद ठेवावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, एखाद्या साथीच्या आजारामुळे वा इतर कारणामुळे ही सेवा तब्बल 10 दिवस बंद राहण्याची पहिलीच वेळ आहे. 1976 मध्ये मुंबई बंदच्या दरम्यान काही दिवस डबेवाल्यांची सेवा बंद होती. त्यानंतर आता सेवा बंद झाली आहे.