नवी दिल्ली - केंद्र सरकारने आज देशभरामध्ये अनलॉक ४ ची नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आधी निर्बंध असलेल्या विविध गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत देशभरातील शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत. मात्र, यात एक बदल करण्यात आला आहे.
नव्या नियमानुसार, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याकरिता शाळेत जाता येणार आहे. मात्र, त्याआधी कुटुंबिय किंवा पालकांची लेखी परवानगी घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक केले आहे. लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्वच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणावर अवलंबून आहेत. घरातून शिक्षण घेताना मुलांना अनेक अडचणीही येत आहेत. मात्र, शिक्षकांचे वैयक्तीक मार्गदर्शन नसल्याने शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत. आता यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार आहे. मात्र, पालकांची परवानगी लागणार आहे.
ऑनलाइन क्लासचा गोंधळ
सध्या शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. शहरी भागात इंटरनेट आणि इतर सुविधेची कोणतीही अडचण नाही. मात्र, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडे मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक गरीब कुटुंबियांतील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इंटरनेटची सुविधाही उपलब्ध नाही. दुर्गम भागात इंटरनेटची रेंज येत नाही. नेटवर्क कमी असल्याने व्हिडिओ प्ले सुद्धा होत नाही. मात्र, आता विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास नियमांच्या अधीन राहुन का होईना परवानगी दिल्याने त्यांच्या अडचणी कमी होतील, अशी अपेक्षा आहे.
भारतात मागील २४ तासात ७६ हजार ४७२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांचा आकडा ३४ लाखांच्याही पुढे गेला आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात ७० हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आत्तापर्यंत ६२ हजार ५०० जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना नियमावलीचे पालन करत टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधी नागरी मंत्रालयाकडून नियमावली जारी केली जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतीक, धार्मिक कार्यक्रम सार्वजनिकरित्या घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, १०० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होऊ शकत नाहीत, अशी अट घालण्यात आली आहे.