मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बदलीचे वारे वाहत असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. अमित शाह मुंबईत एका कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी येत असल्याचे सांगितले जात असले, तरी राजकीय चर्चेला मात्र उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या १००व्या भागानिमित्त विलेपार्ले येथे होणाऱ्या कार्यक्रमात शाह सहभागी झाले आहेत.
भाजपशी जवळीक : राज्यात ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी होत आहेत, या कारणाने शिंदे गट असो किंवा भाजप यांच्यातील नेते अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची पडद्याआड भाजपशी जवळीक वाढत आहे. या कारणाने शिंदे गटातील नेते अस्वस्थ आहेत. तर अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी बघायला भेटत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची येणारी वक्तव्य हे सुद्धा सध्याच्या राजकारणात संभ्रम निर्माण करणारी आहेत. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे वैयक्तिक कारणाने मुंबईत येणार आहेत. तरी सर्वांचे लक्ष त्यांच्या आगमनाकडे लागले आहे.
मन की बात कार्यक्रमात सहभाग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील आठवड्यात अचानक तीन दिवस सु्ट्टीवर गेले होते. त्यावरूनही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अमित शाह यांच्याशी फेस टू फेस करणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १००व्या भागासाठी भाजपने मुंबईतील विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी अमित शाह उपस्थित आहेत. दुसरीकडे अमित शाह यांच्या या मुंबई भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.
हेही वाचा : PM Modi Mann ki baat : मन की बातचा आज शंभरावा भाग; मुंबईतून अमित शाह होणार सहभागी