मुंबई - काल चिपळूण येथील पुरामुळे बाधित झालेल्या व्यापाऱ्यांची आणि तेथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान अनेक व्यापाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी संताप व्यक्त करणाऱ्या महिला व्यापारावर उर्मट भाषेत भास्कर जाधव यांनी उत्तर दिल्याचा आरोप आहे. यावरच देवेंद्र फडणीस यांनीदेखील भास्कर जाधव यांना टोला लगावत जनतेच्या अंगावर धावून जाणे चुकीचे असल्याची टीका केली आहे.
कोकणासाठी विशेष मदत देणे गरजेचे -
कोकणावर एकामागून एक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. चिपळूण आणि रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे कोकणवासीय उघड्यावर पडले आहे. या कोकणवासियांना राज्य सरकारने तत्काळ मदत करणे आवश्यक आहे. या पुरामध्ये अनेकांची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. त्यामुळे कोणतेही निकष न ठेवता राज्य सरकारनेही मदत करणे गरजेचे आहे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती तुटल्यानंतर मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि भारतीय जनता पक्षाची युती होईल. या युतीमुळे दोन्ही पक्षांना बळ मिळेल, अशी चर्चा दोन्ही पक्षांमध्ये दबक्या आवाजात सुरू होती. मात्र, अद्याप अशी कोणतीही अधिकृत चर्चा झाली नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा - गडचिरोली पोलिसांकडून जमिनीत पुरलेले स्फोटक नष्ट, व्हिडीओ व्हायरल