मुंबई - भारतातील तब्बल 17 बँकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्या याला लवकरच मुंबईत आणले जाणार आहे. युनायटेड किंग्डम येथील न्यायालयाने विजय मल्ल्याच्या प्रत्यर्पणाच्या मागणीवर मोहर लावली आहे. त्यामुळे त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय(ईडी) यांचे पथक विजय मल्ल्याला घेऊन मुंबईत दाखल होईल.
विजय मल्ल्याच्या विरोधात सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल केल्यामुळे त्याला मुंबईत आणले जाणार आहे. विजय मल्ल्याला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. येथे त्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल 9 हजार कोटींचे कर्ज थकल्यानंतर 2016 मध्ये विजय मल्ल्या भारतातून पळून गेला होता. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषीत करण्यात आले होते. यानंतर विजय मल्ल्याने त्याच्यावर असलेले कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, भारतीय तपास यंत्रणांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य मल्ल्याने केले नाही.
त्यामुळे भारतीय तपास यंत्रणांनी युकेमधील न्यायालयामध्ये विजय मल्ल्याच्या कस्टडीची मागणी केली होती. 14 मे रोजी या मागणीवर युकेमधील स्थानिक न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यानंतर 28 दिवसांच्या आत विजय मल्याला भारतात नेण्याची मुदत भारतीय तपास यंत्रणांना देण्यात आली होती. आत्तापर्यंत 20 दिवस पूर्ण झाले आहेत, त्यामुळे आता विजय मल्ल्याला कुठल्याही क्षणी भारतात आणले जाईल, असे सांगितले जात आहे.