मुंबई - गिरणी कामगार मराठी माणूस हा ठाकरेंच्या हृदयातला विषय आहे. त्यांच्या घरांची सोडत हा कौटुंबिक कार्यक्रम आहे. घरे तुमच्यासाठी देतोय, एकही घर विकायचे नाही. रक्त सांडून मिळवलेली मुंबई आपली आहे, विकून जाऊ नका, असे वचन देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना केले. गिरणी कामगारांच्या 3 हजार 894 घरांची सोडत आज वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
घरांची किंमत वाढली असली, तरी या सोडतीनुसार ही घरे साडे नऊ लाखांचीच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - बळीराजाला दिलासा; ठाकरे सरकारकडून कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार आणि वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवर या सदनिका उभारण्यात आल्या आहेत. या घरांसाठी 4 हजार 850 अर्ज प्राप्त झाले होते.
'महाराष्ट्राला मुंबई लढा देऊन मिळाली आहे. गिरणी कामगार तेव्हा रस्त्यावर उतरले नसते, तर मुंबई मिळाली नसती. हे तुमचे ऋण आहे, त्यातून मी मुक्त होऊ शकत नाही. गिरणी कामगारांमुळे आज आम्ही आहोत. त्यामुळे जर आज तुमच्यासाठी काही केले नाही, तर इतिहासात नतद्रष्ट म्हणून नोंद होईल' अशी कृतज्ञता मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. 22 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी जाहीर केली. त्यांच्या नोंदणीचे काम झाले असून लवकरच खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - भाजपला भांडण लावल्याशिवाय राजकारण करता येत नाही - नवाब मलिक
स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील गिरणी कामगारांचे योगदान मुंबई कधीही विसरणार नाही. गिरणी कामगारांची घरे, राखीव पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांना १० टक्के घरे ठेवायला उद्धव ठाकरेंनीच सांगितल्याचे यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. 'निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य उद्धव ठाकरेंप्रमाणे आजवर कोणीही दिले नाही. त्यांच्यामध्ये मोठपण असून ते कोणालाही मागे खेचत नाही,' अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी काही वर्षांमध्ये ५० हजार घरे निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहितीही आव्हाड यांनी दिली.