मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर या दोन दिवशी 'इंडिया'ची बैठक मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. ३१ तारखेच्या रात्री 'इंडिया'च्या सर्व नेत्यांसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून डिनर आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता पुन्हा ही बैठक सुरू होईल. या बैठकीसाठी आमच्या महाविकास आघाडीत समन्वय झाला असून बैठकीचे यजमानपद शिवसेना करणार आहे. तामिळनाडू, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब व राजस्थान या पाच राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर विविध पक्षांचे अनेक दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित असणार आहेत. पहिल्यांदा ही बैठक गैरशासित राज्यात होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे.
26 विरोधी पक्ष बैठकीला उपस्थित : बेंगळुरूमध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत देशभरातील २६ पक्ष एकत्र आले व त्यांनी INDIA (इंडिया) आघाडीची स्थापना केली. देशातील विरोधकांची पहिली बैठक पाटणा येथे तर दुसरी बैठक बेंगळुरू येथे मागील महिन्यात झाली. त्याच बैठकीत विरोधी आघाडीला 'इंडिया' हे नाव देण्यात आले. त्या बैठकीसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही उपस्थिती होती. पुढील बैठकीसाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर या तारखेवर शिक्का मोर्तब करण्यात आले आहे.
बैठकीला 'या' दिग्गजांची उपस्थिती : महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज (शनिवारी) मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख तसेच उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड उपस्थित होते.
'इंडिया' नेत्यांची संख्या वाढणार : या बैठकीविषयी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की ही बैठक महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आली आहे. पण संजय राऊत यांनी यजमान पदाबाबत तसे सांगितलं असेल तर त्या पद्धतीने बैठक होईल. इंडियाची समन्वय समिती कशा पद्धतीचे असेल व पुढील वाटचाल कशी असेल ते या मुंबईतील बैठकीतच ठरवले जाईल. तिन्ही पक्षांच्या पाच-पाच नेत्यांची या बैठकीसाठी कमिटी गठीत करण्यात आली आहे. बंगळूरू येथील बैठकीत २६ पक्षांचे प्रमुख नेते होते ही यादी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्याबाबत जो निकाल दिला आहे, त्या निकालाने देशभरामध्ये उत्साह आहे. या बैठकीबाबत मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री हे एक आढावा बैठक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेतील. तसेच या बैठकीमध्ये २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची व्यूव्हरचना, जागावाटप आणि समन्वय समितीच्या अधिकारांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक पक्षाच्या पाच जणांची समिती:
1) राष्ट्रवादी कॉंग्रेस
- जयंत पाटील
- सुप्रिया सुळे
- अनिल देशमुख
- जितेंद्र आव्हाड
- नरेंद्र वर्मा
2) काँग्रेस
- अशोक चव्हाण
- सतेज पाटील
- वर्षा गायकवाड
- नसीम खान
- संजय निरुपम
हेही वाचा:
- INDIA Meeting in Mumbai : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत 'INDIA' ची बैठक; यजमानपदावरुन महाविकास आघाडीत वाद?
- INDIA Meeting in Mumbai : मुंबईत होणाऱ्या 'इंडिया'च्या बैठकीवरून उद्धव ठाकरे व काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढाई, एकवाक्यता होईना!
- Anti Love Jihad Act : लव्ह जिहादविरोधी कायद्यासंदर्भात लवकरचं निर्णय करू- देवेंद्र फडणवीस