मुंबई : एकनाथ शिंदे यांना हाताशी धरुन भाजपाने राज्यातील राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली आणि राज्यातील कधी काळी मित्र पक्ष असलेल्या शिवसेना पक्षात मोठे खिंडार देखील पाडले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 39 आमदारांनी शिवसेना पक्ष सोडला यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार होते, हे सर्वांना माहिती होते. परंतु कर्नाटक राज्यातील उदाहरण समोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत लढा दिला पाहिजे होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांचा डाव यशस्वी ठरला आणि राज्यात शिंदे-फडणवीसचे सरकार आले.
लगेच दिला राजीनामा : दरम्यान, काँग्रेस आणि कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले. तेव्हा सरकार अल्पमतात गेल्यानंतरही कुमारस्वामी बहुमत चाचणीला सामोरे गेले. त्याच जागेवर उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसताच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. फेसबुक लाईव्ह करत राजीनामा देण्याऐवजी जर विधानसभेत सविस्तर भाषण केले असते तर कदाचित याचा परिणाम वेगळा राहिला असता.
राजकीय नेत्यांना नाही आवडला उद्धव ठाकरे यांचा निर्णय : विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावरुन अनेक नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वात आधी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याविषयी नाराजी बोलून दाखवली होती. पक्षांतरबंदी कायद्यानुसार उद्धव ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवर कारवाई करण्याची मोठी संधी होती. कारण शिंदे गटाचे नेते आम्ही पक्षात आहोत, असे म्हणत होते. त्यावेळी पक्ष फुटलेला नव्हता ते पक्षातच होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी गडबडीने राजीनामा दिला, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांचा राजीनामा देण्याचा निर्णय चुकीचा म्हटले आहे.
भावनिक होऊन दिला राजीनामा : उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता त्यादिवशी सायंकाळपर्यंत बहुमत चाचणी करता आली असती. परंतु त्यांनी त्याआधीच राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यावेळी ते म्हणाले की, मला आपलीच माणसे आपल्याविरोधात मत देत आहेत, हे बघायचे नाही. त्याचबरोबर अजून काही कारणे आहेत, ते जाणून घेऊ. बहुमत चाचणीत जर महाविकास आघाडी या सरकारच्याविरोधात मतदान झाले असते तर सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर झाले असते. तसेच भाजपाकडून त्यांची खिल्ली उडवली गेली असते. भाजप नेत्यांसमोर मुख्यमंत्र्यांना राजीनामा देत असल्याचे जाहीर करावे लागले असते. या गोष्टी घडून नयेत म्हणून उद्धव ठाकरेंनी आधीच राजीनामा दिला.
परत बनले असते मुख्यमंत्री : राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेला तेव्हा न्यायालयानेही उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केला होता. उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्याचवेळी त्यांनी त्यांचा अधिकार गमावला असल्याचे न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान म्हटले होते. जर उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते आणि ३९ आमदारांमुळे हरले असते तरीही आम्ही ती चाचणी रद्द केली असती. म्हणजेच मुख्यमंत्री पदावर राहण्याची संधी आम्ही दिली असती असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले होते. इतकेच नाही तर शिवसेना पक्षदेखील उद्धव ठाकरेंकडे राहिला असता. पण राजीमाना दिल्याने त्या गोष्टी गौण ठरल्या.