मुंबई : चार महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज पहिल्यांदाच विदर्भात जाणार ( Uddhav Thackeray in Vidarbha ) आहेत. बुलढाण्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा शेतकरी मेळावा होणार ( Uddhav Thackerays farmer gathering ) आहे.
उद्धव ठाकरे एल्गार करण्याची शक्यता : या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आगामी लढाईसाठी एल्गार करण्याची शक्यता आहे. चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर या शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली राजकीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता ही सभा सुरु होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे शेतकरी आत्महत्या, ओला दुष्काळ, सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यास होत असलेला विलंब या मुद्द्यांवरुन शिंदे- फडणवीस सरकारला टार्गेट करण्याची शक्यता वर्तविण्यात येत ( Uddhav Thackeray target Shinde Fadnavis government ) आहे.
राज्यपाल कोश्यारींचा समाचार घेणार : आजच्या सभेत उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही समाचार घेऊ शकतात. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने विदर्भातील शिवसेनेचा (ठाकरे गट) केडर चार्ज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सभेवेळी ठाकरे गटाकडून बुलढाण्यात मोठे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळू शकते.
उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी अटी : या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी काही अटी घातल्या आहेत. या सभेदरम्यान 'बाळासाहेब ठाकरे अमर रहे', 'उद्धव ठाकरे आगे बढो' या दोनच घोषणा द्याव्यात. तसेच मशाल पेटवण्यासाठी कोणतेही ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगू नयेत. भाषणात कोणाच्याही भावना दुखावल्या जातील, असे वक्तव्य करु नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्ष सभेत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विदर्भातील शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे विदर्भात होत असलेली ही सभा शिवसेनेसाठी (उद्धव ठाकरे गट) महत्त्वाची ठरणार आहे. या सभेत अनेक पक्ष प्रवेश होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.