मुंबई : लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या आगामी निवडणुका आता तोंडावर आहेत. अशातच राज्यात मात्र राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एका बाजूला देशातील सर्व विरोधी पक्ष 'इंडिया' या नावाखाली एकत्र आले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपाने राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शिवसेनेचा शिंदे गट सोबत घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नेहमीच चर्चा होत राहते ती उद्धव ठाकरे देखील भाजपासोबत जाणार का याची. मात्र, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस 'आमदारांनी बंडखोरी केली त्यावेळी आपण भाजपासोबत गेलो असतो. पण, मी नाही गेलो.' या न जाण्यामागचे कारण आता स्वतः उद्धव ठाकरे यांनीच सांगितलं आहे.
पुन्हा पॅचअप केलं नाही : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सध्या राज्यातील विविध मतदार संघाचा आढावा घेत आहेत. बुधवारी देखील एक आढावा बैठक मातोश्रीवर बोलवण्यात आली होती. या बैठकीत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पक्षप्रवेश देखील झाला. या पक्षप्रवेशावेळी आलेल्या कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपण भाजपासोबत का युती केली नाही? याची 'मन की बात' सांगितली. उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपासोबत युती करण्याची संधी आली होती. मी पुन्हा युती करू शकलो असतो. पण, असं करणं माझ्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे मी भाजपासोबत पुन्हा पॅचअप केलं नाही."
कारण स्वाभिमान महत्त्वाचा : उध्दव ठाकरे म्हणाले की, "मी भाजपासोबत गेलो नाही कारण स्वाभिमान महत्त्वाचा आहे. मी भाजपासोबत गेलो असतो तर कदाचित शिवसेनेचा दरारा कायम राहिला नसता. शिवसेनेचा हा दरारा कायम राखणे महत्त्वाचं होतं. 2014 पासून ज्या लोकांनी आपल्याला फसवलं त्यांच्यासोबत कसं जाणार? त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. मी ठरवलं असतं तर आपल्या आमदारांना डांबून देखील ठेवू शकलो असतो. मात्र, जे मनाने फुटले आहेत, त्यांना एका खोलीत डांबून ठेवून काय फायदा? त्यांना मी काय कमी केलं होतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ठाकरेंचा पुन्हा सत्तेत येण्याचा दावा : बुधवारी माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला. या कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, "तुम्हाला देखील जायचं असल्यास बिनधास्त जा. आगामी काळात आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत. बहुमताने निवडून येणार आहोत. मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. मी निवडणूक लढवणार नाही." असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा: