मुंबई : पावसाळी अधिवेशनात आजही सभागृहात आणि सभागृहाबाहेर संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधक आक्रमक झाले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहतो. तसेच नितीन देसाई उत्साहात असायचे ते असले की काहीच अशक्य वाटत नव्हते. नितीन देसाई यांची आत्महत्या हा धक्का आहे.
विरोधक आक्रमक झाले : संभाजी भिडे यांचा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी निवेदन सादर करताना भिडे गुरुजी केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस याना लक्ष्य केले आहे. भिडे फडणवीस यांचे गुरूजी असतील तर त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा कशी करायची. आपण भविष्याकडे न पाहता इतिहासच उगाळत उत्खनन करत चाललो आहे. यातून काय मिळणार नसून भविष्य मारून टाकायची पद्धतच आपल्या देशाला आणि राज्याला घातक असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मणिपूरबद्दल पंतप्रधान बोलत नाहीत : मणिपूरमध्ये बघा भाजप राज्य कारभार करू शकत नाही. हरियाणा, मणिपूरमध्ये काय सुरू आहे. पंतप्रधान मणिपूरबद्दल पुण्यात बोलतील पण ते तिथेसुद्धा बोलले नाहीत. सत्यपाल मलिक बोलले हे भयंकर आहे. ते प्रशासक म्हणून काम करत होते. महिलांच्या मुद्यावर साधी चर्चासुद्धा नाही होऊ शकत हे खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
विधानसभेला काळीमा फासणारे काम : काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेत्याबाबत नियुक्तीपत्र विधानसभा अध्यक्षांना दिल्यानंतर विरोधी पक्ष नेते पदाची घोषणा विधानसभा अध्यक्ष करतील अशी अपेक्षा होती. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेला काळीमा फासणारे काम सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
हेच तुमच हिंदुत्व का : उपमुख्यमंत्री यांनी भिडे यांचा उल्लेख गुरुजी असा केला. त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार या जातीवादी विचाराला संपवेल. खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भाजप कितीही म्हणेल की, ते त्यांचे नाहीत पण तसे नाही. संभाजी भिडेंचे सहकारी ज्यांना धारकरी म्हणतात ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देतात. लोकांना जीवे मारण्याचे हे कसले हिंदुत्व, हे हिंदुत्व फडणवीस यांना मान्य आहे का? भाजपाचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
हेही वाचा -