मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. मात्र या सुनावणीत निर्णय अपेक्षित होते. मात्र अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर निर्णय दिलेला नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषदेतून काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंधेरी पूर्व येथे झालेल्या पोट निवडणुकीआधी निवडणूक लढवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवण्याची मागणी केली होती. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील तत्परतेने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठावले. त्यावर देखील उद्धव ठाकरे बेलण्याची शक्यता आहे.
नेते उपनेत्यांसोबत महत्त्वाची बैठक : पत्रकार परिषदेसह उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाच्या नेत्यांची आणि उपनेत्यांची देखील महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते आपल्या कार्यकर्त्यांना नेमका कोणता संदेश देणार आहेत हे गुलदसत्यात आहे. होऊ घातलेल्या निवडणुकांबाबत या बैठकीतून नेत्यांना आणि उपनेत्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून काही महत्त्वाचे आदेश दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या बैठकीबाबत देखील उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत बोलू शकतील. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे गटाने आपला उमेदवार उभा केला नाही या मुद्द्यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या तत्परतेने शिवसेनेचे नाव आणि पक्षाचे चिन्ह गोठवले ती सत्वता केंद्रीय निवडणूक आयोगा आता का दाखवत नाही असा सवाल पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारला जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वरळी सभेवर भाष्य करणार? : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि आपणही राजीनामा देऊ आणि वरळी येथे आपल्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीला उभे राहून दाखवावे असे आव्हान आदित्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघ असलेल्या वरळीमध्ये मुख्यमंत्र्यांचा कोळी बांधवांकडून सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
या कार्यक्रमाची जय्यत तयारी एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना सभेमध्ये नागरिक अत्यंत कमी प्रमाणात उपस्थित असल्याचे ट्विट ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी वरळीत घेतलेल्या सभेला नागरिकांकडून पाठ फिरवण्यात आली असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वरळीत घेतलेल्या सभेवर देखील उद्धव ठाकरे आज आपल्या पत्रकार परिषदेतून भाष्य करतील अशी शक्यता आहे.