मुंबई : Uddhav Thackeray on Jalna Lathicharge : शुक्रवारी 'इंडिया' आघाडीच्या बैठकीचा पत्रकार परिषदेने शेवट झाला. या बैठकीनंतर महाराष्ट्रात ठाकरे गट निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. यासाठी आता ठाकरे गटाकडून केंद्र सरकारच्या योजनांची पोलखोल करण्यासाठी 'होऊ द्या चर्चा' ही नवीन मोहीमच आखण्यात आली आहे. एका बाजूला दिवसेंदिवस आंदोलकांवर होणारे लाठीचार्ज आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारचे अपयश अशा दोन्ही बाजू जनतेसमोर मांडा, असे आदेश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. यासाठी ठाकरे गटाकडून शनिवारी वांद्रे येथे मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला होता.
एक फुल दोन हाफ सरकार : या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज, वारकऱ्यांना पोलिसांकडून करण्यात आलेली मारहाण आणि त्यानंतर आता जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज (Jalna Maratha Protest) या मुद्द्यांवरून राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार कोण तर 'एक'फुल दोन हाफ'. लोक उपोषणाला बसले होते. तर दुसरीकडं 'इंडिया'ची बैठक सुरू होती. या बैठकीवर टीका करण्यासाठी सरकारला पत्रकार परिषद घ्यायला वेळ आहे. पण, आंदोलनकर्ते बसले तिकडे जाण्यासाठी कोणत्याच मंत्र्यांना वेळ नाही. 'एक फुल दोन हाफ'ला माहिती नव्हती उपोषण सुरू आहे. तुमच्या आदेशाशिवाय पोलीस असे वागूच शकत नाहीत. 'सरकार आपल्या दारी' थापा मारत आहे,
मुख्यमंत्र्यांना टोला : महागाई वाढलेली आहे. या परिस्थितीत लाठीमार करताय, घरात घुसणार पोलीस आणि आम्ही तुमच्या दारी. हीच हुकूमशाही चिरडण्यासाठी आम्ही 'इंडिया' म्हणून एकत्र आलो आहोत. मी तुमच्या घराण्याबद्दल विचारतच नाही, पण जी लोकं कुटुंब व्यवस्था नाकारतात त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये. अगोदर स्वतःचं कुटुंब सांभाळा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता लगावला.
पंतप्रधान आभास योजना : डिसेंबर महिन्यात खासगी विमानं, हेलिकॉप्टर आरक्षित केलेली आहेत. आज महाराष्ट्र तापलेला आहे, जमिनीची मशागत करण्याची ही वेळ आहे. 'चाय पे चर्चा' २०१४ साली झाली, आता आपल्याला 'होऊन जाऊ दे चर्चा' सुरू करायची आहे. कर्नाटकात भाजपाचा भ्रष्टाचार लोकांपर्यंत पोहचला होता. तोच मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात पोचवायच्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जा, पीएम किसान सन्मान योजनेबाबत शेतकऱ्यांना विचारा, चर्चा करा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. तसेच 'पंतप्रधान आवास योजना' नसून ही 'पंतप्रधान आभास योजना' आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
शेतातलं घर गहाण ठेवण्याची वेळ : सरकार उद्या तुम्हाला म्हणेल चंद्रावर सगळ्यांना घरं देतो. पण, आता शेतातले घर गहाण ठेवावे लागत आहे. गॅस सिलेंडर स्वस्त पण भाज्या, डाळी महाग झाल्या. तुम्हाला कर्तृत्वानं निवडणुका जिंकता येत नाही. भाड्यानं जमवलेली पार्टी म्हणजे भाजपा आहे. शिवसेना निष्ठेवर चालणारा पक्ष असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी खडसावून सांगितले.
हेही वाचा -