मुंबई : देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजप विरोधकांची झाडाझडती घेत आहे. भाजपची वाटचाल हिटलरच्या दिशेने चालू आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. वरळी येथील पदाधिकारी शिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
'इंग्रजांप्रमाणे भाजप देखील गुर्मीत आहे' : उद्धव ठाकरे म्हणाले की, 'इंग्रजांप्रमाणे भाजप देखील गुर्मीत आहे. आपल्याला क्रांतिकारकांसारखी शपथ घेऊन भाजपला रोखायचे आहे'. आगामी निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करुन देश वाचवूया, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केले. यावेळी त्यांनी शिंदे गटाचाही चांगलाच समाचार घेतला. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आणि परवा जागतिक गद्दार दिन, आहे असे ते म्हणाले.
'मोदी मणिपूरला का जात नाही?' : यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही टीका केली. मोदी अमेरिकेत जात आहेत, मात्र मणिपूरला का जात नाही? असा सवाल त्यांनी केला. मोदींनी मणिपूरला जाऊन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. भाजप सरकारच्या काळात मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केला. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
'370 ला आमचा पाठिंबा' : उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, 370 ला आमचा पाठिंबा आहे, पण अजूनही सरकार जम्मू - काश्मीर मध्ये निवडणुका का घेऊ शकत नाही, याचे उत्तर द्यावे. तिथला हिंदू अजुनही सुरक्षित नाही, काश्मिरी पंडित अजूनही परतलेला नाही, असे ते म्हणाले. समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा आहे मात्र त्याचा हिंदूंना किती त्रास होणार हे पण सांगा, असे ते म्हणाले. गोवंश हत्या बंदी तुम्ही देशभरात लागू करू शकत नाही. त्यासाठी आधी समान वागणूक कायदा आणा, असे आवाहन त्यांनी केले.
'देशासाठी लढणारे सगळेच हिंदू' : तुम्ही सत्तेत असूनही हिंदू कसा खतरे में? तुम्ही सत्तेत आल्यावरच कश्या दंगली सुरु झाला, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारला. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वाचे हिंदुत्व आहे. गोमूत्र, शेंडी, जानवे, केवळ देवळात घंटा बडवणारा हिंदू आम्हाला मान्य नाही. देशासाठी लढणारे सगळेच हिंदू आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मनिषा कायंदेंची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी : शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. त्यानंतर आता त्यांची उद्धव गटाच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ही हकालपट्टी करण्यात आली आहे.
हेही वाचा :