मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत दिलेल्या निकालाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान कर्नाटक मध्ये भाजपला घालवले, महाराष्ट्रातून ही तसेच घालवू असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग : राज्यातील सत्ता संघर्ष, 16 आमदारांच्या अपात्रचे मुद्दा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. या निकालात सत्ता संघर्षाचा मुद्दा सात न्यायाधीशांच्या खंडपिठाकडे पाठवला. तर 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात 15 आमदारांसह शिवसेनेत बंड केले. सुरत व्हाया गुवाहाटीला गेले होते. दरम्यान विधानसभेत गटनेतेपदी स्वतः शिंदे आणि प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली. न्यायालयाने यावर जोरदार ताशेरे ओढले. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षावर दावा करता येणार नाही, अशा शब्दात यावेळी शिंदे गटाला खडसावले. तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात विधानसभा अध्यक्षांचे अधिकार कायम ठेवत, अपात्रतेचा निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
निकाल जनतेपर्यंत पोहचवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाच्या निकालाची चुकीच्या पद्धतीने मांडणी केली आहे. लोकांच्या मनात गैरसमज पसरवला जातो आहे. परंतु सत्ता संघर्षाचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे. शिवसेना ही आपली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची सर्वसामान्य जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आमदार पदाधिकारी आणि नेत्यांनी पुढाकार घ्यावा अशा सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. कर्नाटकात सर्वसामान्य जनतेने भाजपला घालवले आहे. महाराष्ट्रात देखील त्याची पुनरावृत्ती करू आणि महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करू, असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
- हेही वाचा -
Raj Thackeray Taunt BJP : कर्नाटक निवडणुकीत 'भारत जोडो' यात्रेचा परिणाम; राज ठाकरेंचा भाजपला टोला
Karnataka Congress : कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? आज विधिमंडळ पक्षाची बैठक