मुंबई Shiv Sena Thackeray Group Aggressive : खरी शिवसेना कुणाची, या वादावर आज अखेर पडदा पडला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी या प्रकरणावर आज निकाल जाहीर केला. अध्यक्ष नार्वेकर यांनी विधानसभेत 1200 पानी निर्णयाचे मुख्य मुद्दे मांडले. या प्रकरणावर एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या 34 याचिका 6 याचिकांमध्ये एकत्र करून अध्यक्ष नार्वेकर यांनी हा निकाल दिला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना हा अधिकृत पक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाच असल्याचं जाहीर केलं. तसंच शिवसेना शिंदे गटाचे 16 आमदार देखील पात्र असल्याचं जाहीर केल्याने, शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
काळे झेंडे आणि निषेधाचे बॅनर घेऊन केली घोषणाबाजी : अध्यक्ष नार्वेकर यांनी निकालाचं वाचन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयामुळं ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंत्रालयाच्या समोरच शिवसेना ठाकरे गटाचं संपर्क कार्यालय आहे. या संपर्क कार्यालयात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी विधानसभा अध्यक्षांचा निकाल लाईव्ह पाहात होते. या निकाल पत्र वाचनात अध्यक्ष नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाचे सर्व पदाधिका आणि कार्यकर्ते हे संतापले आणि शिवालया बाहेर आले. शिवालयात आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधाचे बॅनर ठेवण्यात आले होते. काळे झेंडे आणि निषेधाचे बॅनर घेऊन सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री शिंदे आणि अध्यक्ष नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले. कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने मंत्रालयासमोरील विधानभवनाकडे जाणारा आणि मरीन ड्राईव्हकडे जाणारा रस्ता अडवण्यात आला होता.
ज्यांनी यांना घडवलं त्यांच्याच विरोधात गद्दारी : माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते म्हणाले की, आम्ही या निकालाचा निषेध करतो. आजचा हा निकाल म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी सरकारची घेतलेली बाजू आहे. हा घटनाबाह्य निर्णय असल्याने आम्ही आता निदर्शने करत आहोत. ज्यांनी यांना घडवलं त्यांच्याच विरोधात यांनी गद्दारी केली. आता या गद्दारांना त्यांची जागा जनताच दाखवून देईल. लोकशाहीसाठी आज काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या पदाचा मान घालवला. सर्वोच्च न्यायालयाने काही नियम सांगितले होते. त्याच नियमांमध्ये आजचा निकाल येणे अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही. अध्यक्षांनी त्यांच्या पदाची मान घालवला याची इतिहासात नोंद होईल.
पोलिसांनी घेतलं कार्यकर्त्यांना ताब्यात : संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अश्लील घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. मंत्रालयासमोरील मुख्य रस्ता दोन्ही बाजूने अडवला गेला. यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळं पोलिसांनी बळाचा वापर करत निदर्शने करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
हेही वाचा -