मुंबई : Uddhav Thackeray Dasara Melava : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांने, 57 वर्षांनंतरही शिवसेनेनं दसरा मेळाव्याची परंपरा तोडलेली नाही. ज्यांनी आमचा नाश करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा नाश करून आम्ही पुढे जात आहोत. आमच्या मेळाव्यानंतर आम्ही खोकासुराचे दहन करू. रामानं रावणाचा वध का केला? कारण मी ऐकले आहे की रावण देखील शिवभक्त होता. तरीही रावण वेडा झाल्यामुळं रामाला त्याचा वध करावा लागला. रावणानं सीतेचं अपहरण केलं होतं. तसंच आमच्या शिवसेनेला पळण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांवर टीका केली.
आमच्या नादाला लागू नका : आमच्या नादाला लागू नका ,असा इशारा ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलाय. मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी गावात पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात अनेक जण जखमी होते. मराठा नेते मनोज जरांगे यांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवलंय. त्यांनी आज धनगरांनापण साद घातली आहे. मात्र, सरकारनं जालियनवाला बाग हत्याकांडासारखी परिस्थिती निर्माण केली होती. मीही मुख्यमंत्री होतो. मात्र, मी कधीही लाठीहल्ल्याचा आदेश दिला नाही. जालन्यातील लाठी हल्ल्याचा जनरल डायर कोण आहे? असा सवाल त्यांनी राज्य सरकराला केला.
आरक्षणाचा निर्णय संसदेत घ्या : गद्दारांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाचा निर्णय संसदेत घ्यावा. तुम्ही कितीही माझ्यावर टीका केली तरी, मी तुम्हाला उत्तर देत नसल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय. भाजपा समाजात भांडण लावण्याचा डाव करत असल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केलाय. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारचा डाव वेळीच ओळखल्याचंही ते म्हणाले.
चुली पेटवाच्या ऐवजी घर पेटवण्याचं काम : भाजपाचा कधीही स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, मराठवाडा मुक्ती संग्रामातही यांचा सहभाग नव्हता, असा हल्लाबोल ठाकरे यांनी भाजपावर केलाय. यांचा चळवळीशीही काहीही संबंध नव्हता. भाजपा जिथं जातो तिथं नाश करतो, असं टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सोडलंय. नागरिकांच्या चुली पेटवाच्या ऐवजी घर पेटवण्याचं काम सुरू असल्याची टीका देखील ठाकरे यांनी केलीय.
न्यायालयाचं अस्तित्व शिल्लक राहणार का? : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर देखील ठाकरे यांनी वक्तव्य केलंय. मी न्यायाधीशांचा आदर करतो. मात्र, आज देश पाहतोय. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व शिल्लक राहणार आहे का? असा सवाल त्यांनी केलाय. न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर निवडणुका घेऊन दाखवा, असं आवाहन देखील त्यांनी केलं. घराणेशाहीवर बोलताना ठाकरे म्हणाले, मला माझ्या वडिलांचा, आजोबांचा, पूर्वजांचा अभिमान आहे. त्यामुळं सर्वंच घराणे वाईट नसतात. मात्र, ज्यांच्या मागंपुढं कोणी नाही, त्यांच्या हातात सत्ता दिली तर काय होणार हे हिटलरच्या सत्तेवरून लक्षात येत आहे.
विकास केवळ मित्राचे खिसे भरण्यासाठी : आम्ही मुंबई वाचवली, आज त्याचं कौतुक नाही. आधी तुमचे घोटाळे पाहा, मग आमच्यावर बोला. आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. तुमचे नेते दिल्लीत गो कोरोना गो म्हणत असताना आमच्या सरकारनं गरिबाला जेवणाची थाळी उपलब्ध करून दिली. मात्र, तुमचे नेते थाळी पीटवत होते, असा हल्लाबोल देखील त्यांनी मोदींवर केला. आम्ही नागरिकांचे प्राण वाचवले, हेच आमचं हिंदुत्व आहे. हे धारावी पण गिळायला निघाले आहेत. भाजपाचा विकास केवळ मित्राचे खिसे भरण्यासाठी होऊ देणार नाही, असा निर्धार ठाकरेंनी केलाय. धारावीच्या परिसरात विकास करा, मात्र गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करुन द्या, पोलिसांना देखील धारावीत घर द्या, अशी मागणी ठाकरे यांनी केली. सामान्याला परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून द्या. मात्र, तुमच्या मित्राच्या खिशात धारावी घालणार असाल तर तसं आम्ही होऊ देणार नाही, असं ठाकरे यांनी म्हटलंय.
आरक्षणासाठी समाज रस्त्यावर : सध्या दुष्काळाची परिस्थिती दिसतेय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होतोय. आता दुष्काळ पडला, सरकारनं बैठक घेतली. मात्र, विमा कपन्यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याचा आरोप केलाय. शेतकऱ्यांसोबत तुम्ही उभे राहा, विमा कंपन्या कोणाच्या आहेत? शेतकरी वाऱ्यावर सोडला आहे. आरक्षणासाठी समाज रस्त्यावर आले आहेत. त्यांनाही न्याय द्या, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
भावनेशी खेळाल तर तुमचा कोथळा काढू : आमचं हिंदूत्व राष्ट्रीय आहे. जो जात पात धर्मांनं कोणीही असला तरी, तो आमचा आहे. आमचं हिंदुत्व शेडींशी जोडलेलं नाही. संपूर्ण भारत महाराष्ट्रकडं पाहतोय. आमच्या भावनेशी खेळ करणार असाल तर तुमचा कोथळा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. मराठी माणसांची एकजूट आपल्याला करावी लागणार आहे. शिवरायांचा भगावा आपल्याला फडकायचा आहे. सरकारला माझं आव्हान आहे, तुमच्यात धमक असेल तर निवडणुका घेऊन दाखवा. मात्र, हे घाबरट सरकार आहे. जनतेच्या कोर्टात होणारा निर्णय आम्हाला मान्य असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
हेही वाचा -