मालेगाव (नाशिक) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे जाहीर सभा पार पडली. उद्धव ठाकरे यांनी या सभेत शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधींना इशारा दिला आहे.
राहुल गांधींना इशारा : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना इशारा दिला आहे. सावरकर आमचे दैवत आहेत. आम्ही आमच्या दैवतांचा अपमान सहन करणार नाही. सावरकर आमचे दैवत असून, तब्बल 14 वर्ष सावरकरांनी छळ सोसला. देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, यामुळे आम्ही त्यांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
भाजपवर टीका : भाजपमधील नेते सावरकर भक्त आहेत आणि आम्ही देखील सावरकर भक्त आहोत. पण ज्या सावरकारांनी मी मिळवून दिलेले स्वातंत्र्य तुम्ही कसे जपत आहेत. कारण तुमचा नेता म्हणजे भारत नाही. देशाची वाटचाल ही हुकमशाहीकडे सुरू आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचा काहीच संबंध नव्हता तेच आज देश गिळायला निघाले आहेत, असा निशाणा त्यांनी भाजपला लगावला आहे.
शिंदे गटावर टीका : माझी लढाई मुख्यमंत्री होण्यासाठी नाही. तर सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीत जिंकण्यापर्यंत लढायचे आहे. मुख्यमंत्री पद येते आणि जाते. तुमचे प्रेम गद्दारांच्या नशिबात नाही तसेच त्यांनी ठाकरे गटावर टीका करताना सांगितले की, गद्दारांना ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही. मिंधे गटाने शिवसेनेचे नाव व धनुष्यबाण चोरले पण जनतेचे प्रेम ते चोरू शकत नाहीत. तसेच ते प्रेम त्यांना विकत देखील घेता येणार नाही. सत्ता गेल्याचे दु:ख नाही पण सत्ता गेल्यानंतर विकास कामे करणारे सरकार गेल्याचे दु:ख आहे. गद्दारी करून तुम्ही सरकार पाडले. तुम्ही तुमच्या हाताने कपाळावर गद्दार म्हणून शिक्का मारला आहे. हा शिक्का कधीही पुसला जाणार नाही.
ठाकरेंचे भाजपला आव्हान : उद्धव ठाकरे जाहीर सभेत पुढे म्हणाले की, भाजपा मिंधेंना नेता मानून निवडणूका लढवणार का? भाजपला सध्या असे वाटत असेल की, जर भाजप शिवसेना तोडून शकतो, परंतु तुमची 152 कुळे जरी खाली उतरली तर ठाकरेंपासून तुम्ही शिवसेना तोडू शकत नाही. येणाऱ्या निवडणूकीत तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मत मागा आणि मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर निशाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांचे पत्र वाचू शकत नाही. शेतकर्याला हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त आम्ही केले. विकेल ते पिकेल आम्ही धोरण आणणार होतो. राज्याचे कृषी मंत्र्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे, ते काळोखात देखील जाऊन अवकाळीची पाहणी करत आहेत. कृषी मंत्री शेतकऱ्यांचे नुकसान काळोखात करतात. तसेच ते महिलांना शिव्या देतात. यापूर्वी त्यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. तरीही मंत्री म्हणून निर्लजासारखे मांडीला मांडी लावून बसतात. हेच काम तुमचे हिंदुत्व, असा प्रश्न त्यांनी भाजपला केला आहे. तसेच मागच्या वर्षी कांद्याला भाव मिळाला. एक कांद्याची 50 खोक्यांमध्ये विक्री झाली. शेतकर्यांच्या कांद्यांने किती भाव मिळाला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.उद्धव ठाकरेंचा सुहास कांदेना टोला लगावला.
हेच आमचे हिंदुत्व : प्रत्येकाला प्रत्येकाच्या कुटुंबासोबत प्रेम असते. जर आमच्या कुटुंबीयांचा बदनामीचा कुटील डाव थांबवला नाही तर आम्ही देखील तुमच्या कुटुंबीयांची बदनामी चव्हाट्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीयत्व म्हणजे आमचे हिंदुत्व आहे. शेंडी जाणव्याचे आमचे हिंदुत्व नाही. विरोधकांची अगदी निर्घृणपणे चौकशा केल्या जात आहेत. बिहारमध्ये लालू प्रसाद यांच्या सुनेची गर्भवती असताना देखील चौकशी केली. अनिल देशमुखांच्या 5 ते 6 वर्षांच्या नातीची तुम्ही चौकशी करत आहात आणि हे तुमचे हिंदुत्व आहे का, असा प्रहार त्यांनी चढवला. ज्यांच्यावर भ्रष्टाचारीचे आरोप होते. त्यांना तुम्ही पक्षात घेतले. ते तुमच्यासोबत आल्यानंतर त्यांच्या चौकशीचे काय झाले, असा प्रश्न त्यांनी केला आहे. भाजप म्हणजे भ्रष्ट झालेला पक्ष असा टोला देखील त्यांनी लगावला.