मुंबई : तेच चैतन्य, तोच उत्साह आणि तीच गर्दी आजही पाहायला मिळत आहे. खोक्यांनी गद्दार विकले जाऊ शकतात, सच्चा कार्यकर्ता विकला जाणार नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आपल्या शिवसेनेसोबत आले आहेत. वारसांचे आणि विचारांचे नातू एकत्र आलेत, असे सांगतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याला वंदन करून आलो आहे. आज विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होत आहे. दुपारी मला या तैलचित्राच्या अनावरणाबाबत विचारण्यात आले. त्यावर मी म्हणालो की, मी बघितलेले नाही. ज्या कलाकाराने ते चित्र चितारले असेल, त्यांचा मला अपमान करायचा नाही. परंतु, त्यांना योग्य तेवढा वेळ दिला आहे का? हे त्यांना विचारणे गरजेचे आहे. कारण घाईगडबडीमध्ये काहीतरी रंगवून ठेवायचे आणि हे तुझे वडील, असे सांगायचे. हे अजिबात चालणार नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी तैलचित्रावरून नाराजी व्यक्त केली आहे.
देश हुकूमशाहीच्या दिशेला : दसरा मेळाव्यात वडील चोरणारी टोळी म्हटले होते. मात्र, आता दुसऱ्यांचे वडील चोरताना स्वतःच्या वडिलांना विसरू नका, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तसेच, प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले एकत्र आले होते. पण त्यानंतर ते भाजपच्या कळपात गेले. आज दोन्ही वारसाचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. दोघे नातू एकत्र आल्यानंतर जे डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझे काही काम नाही. कारण देश हुकूमशाहीच्या दिशेला चालला आहे. हिंदुत्वाच्या आधारावर धोक्याची भिंत उभी करायची आणि त्याआडून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
त्यामागचा हेतू वाईट : महाविकास आघाडीचे सरकार असताना सरकार का पाडले? तर हिंदुत्व सोडले आणि शरद पवारांच्या आहारी गेले. आणि काल सांगतात की, शरद पवार खूप गोड माणूस. मी फोनवर त्यांचे मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो? ही अशी सगळी माणसी आहेत. तुमची कृती चांगली आहे. बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहेत. त्याचा अभिमान आहे. पण त्यामागचा हेतू वाईट आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे. याबरोबरच, आपण यानंतरही जाहीर सभा घेऊ आणि तिथे मला काय बोलायचे आहे ते मी बोलेल अस म्हण त्यांनी येणाऱया काळात पुन्हा एकदा जाहीर सभा घेण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा : बाळासाहेब ठाकरेंच्या पुर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिवादन