मुंबई: देशाचे गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालावरून काल त्यांनी पुण्यात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. गृहमंत्री शाह यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शाह यांनी दूधात मिठाचा खडा टाकला आहे. आणि म्हणून आता दूधात साखर टाकण्यासाठी मला जनतेच्या सोबतीची गरज आहे. मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
माझे काय चुकले?: शिवसेनेवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांना माझे वडिलांचे नाव हवे पण त्यांचा मुलगा नको आहे. काय केले आम्ही, असा भावूक प्रश्न त्यांनी केला. तसेच जनतेला विचारा माझे काय चुकले आहे. हिंदुत्वावरून मला मुर्ख बनवले जात आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी माझ्यासोबत त्यांनी वचन दिले होते. त्यांनी जर ते पुर्ण केले असते तर हे झाले नसते, असेही त्यांनी सांगितले. पण आता ते निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मशालही काढून घेतील, असे खालच्या पातळीच्या राजकारणाला सुरूवात झाली असल्याचे ते म्हणाले. देशात कुठल्याही पक्षासोबत असे होऊ शकते यामुळे आतापासूनच सावध राहायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
अमित शाह यांचे प्रत्युत्तर: गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूरातील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत प्रचार केला पण मतदानाचा निकाल आल्यावर ते सर्व विचारसरणी विसरून शरद पवारांच्या पाया पडले आणि स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी पवारांना विनंती केली. भाजपला सत्तेचा लोभ नाही तसेच आम्ही आमची विचारधारा कधीच विसरणार नाही, असे गृहमंत्री शाह म्हणाले.
शाहांनी विरोधकांवर केली टीका: गृहमंत्री अमित शाह पुढे म्हणाले की, 2014 पूर्वी सत्तेत असलेले प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. पाक दहशतवादी आमच्या लष्करी अधिकाऱ्यांची हत्या करायचे. या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्याची हिंमत कोणातच नव्हती. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत होती, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
देशात हुकूमशाहीला सुरूवात: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावरून त्यांनी सांगितले की, जे होते ते चांगल्यासाठी होते. निवडणूक आयोगाच्या निकालावरून सामान्य जनतेच्या मनात असंतोषाची आग पेटली आहे. तसेच त्यांनी सांगितले की, मुंबईला दासी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईला दिल्लीची भीक नको आहे. देशातील जनतेने भिकेचा कटोरा घेऊन हातात बसावे, अशी केंद्र सरकारची मानसिकता आहे. आणि यालाच हुकूमशाही म्हणतात, अशी टीका त्यांनी केली आहे.
एकत्र येण्याचे केले आवाहन: उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना महामारिच्या काळात उत्तर भारतीय नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पोहचणे आव्हानाचे झाले होते. ताळेबंदी जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच मी केंद्र सरकारसोबत उत्तर भारतीयांना परत पाठवण्याबाबत मदत मागितली. पण त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारने हे शक्य नसल्याचे सांगितले. यानंतर आमच्या सरकारमधील तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत बोलून त्यावेळी साडेसात लाख लोकांना त्यांच्या गावाच्या सीमेपर्यंत पोहचवले. यामुळे येणाऱ्या काळात उत्तर भारतीय आणि मराठी असा भेद न ठेवता तुम्ही-आम्ही एकत्र आलो पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सोबत रहावे लागेल: उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाही जिवंत राहणार की नाही हे आता ठरवण्याची वेळ आली आहे. उपस्थितांना त्यांनी सांगितले की, माझ्या सोबत यायचे असेल तर सोबत ही रहावे लागेल. सध्या माझ्या हातात काहीच नाही. एक माईकच आहे ज्याच्याने मी तुमच्यासोबत संवाद माझ्या ह्दयातील गोष्ट करू शकतो. लोकांसोबत मला फक्त ह्रदयाची गोष्ट करायची मन की बात नव्हे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता टीका केली.
हेही वाचा: Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही तर तो एक विचार - गृहमंत्री अमित शहा