मुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे अभिनंदन केले आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, गुजरात विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. गुजरात सोबतच हिमाचल प्रदेश विधानसभेचे निकाल लागले व तेथे काँग्रेसचा दणदणीत विजय झाला तर दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आपले भाजपवर मात केली आहे. याबद्दलही ठाकरे यांनी काँग्रेस आणि आमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
गुजरातचा निकाल अपेक्षितच- ठाकरे: गुजरातच्या विजयासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले की, गुजरातचा निकाल अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले आहे. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत, असा टोलाही ठाकरे यांनी यावेळी लगावला.
मोठ्या प्रमाणात मत विभागणी: पंतप्रधान मोदी 11 तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील, ही अपेक्षा आहेत. आपने गुजरातीत मोठ्या प्रमाणात मत विभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला, हेही स्पष्ट झाले आहे. ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असते, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.