मुंबई : आगामी निवडणुका तोंडावर आल्याने राज्यात वाढलेल्या राजकीय भेटीगाठी मतांचे ध्रुवीकरण आहे. राजकीय समीकरण बदलाची ही सुरुवात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेनेला गळती मात्र ठाकरे गटाला विरोधी पक्षांकडून समर्थन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली. आमदार, खासदारांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठाकरेंना रामराम केला. राज्यात त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरेंच्या पाठीशी ठाम राहिले. दुसरीकडे लोकसभा, राज्यसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर देशभरातील सर्व विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्री, नेत्यांकडून ठाकरेंना समर्थन मिळत आहे.
मुंबई महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न- भाजप वगळता महाराष्ट्र दौऱ्यावर येणाऱ्या नेत्यांकडून ठाकरेंच्या भेटी गाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे कडवे आव्हान असणार आहे. येत्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई मनपातील शिवसेना ठाकरेंची मागील 25 वर्षांपासूनची एक हाती सत्तेला सुरुंग लावण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीदेखील मुंबई मनपामध्ये भाजपचाच महापौर होणार असल्याचा ठाम विश्वास यापूर्वी व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरेंच्या परराज्यात वाढल्या भेटी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड ही भाजपची खेळी आहे, असे बोलले जाते. तर मुंबई महापालिकेत सत्तेपासून भाजप अलिप्त ठेवण्याची व्युहरचना ठाकरेंनी आखली आहे. महाराष्ट्र बाहेरील भाजपशासित राज्य वगळता, मुख्यमंत्र्यांची भेटी गाठी घेत आहेत. तर युवासेना प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे परराज्यात जावून चर्चा करत आहेत. परराज्यातील मुख्य नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला मुंबईत येत आहेत.
मुंबईत इतर राज्यांतील लोकांचे वास्तव्य लक्षणीय- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर. यांनी यापूर्वी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत आले असून उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुंबई निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाली. मुंबईत सर्वधर्मिय व राज्यातील लोक राहतात. मुंबईत राहणाऱ्या दिल्लीतील लोकांचे वास्तव्य देखील लक्षणीय आहे.
शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरेंची खेळी- आगामी निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण सत्तेचे समीकरण बदलण्यास उपयुक्त ठरेल. तसेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांचे सहकार्य फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे दिल्लीत ठाकरेंनी आम आदमी पक्षाला तर महाराष्ट्रात केजरीवाल यांनी ठाकरेंना सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. भाजप आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी आणि सत्तेची गणित जुळवण्याचा ठाकरेंनी खेळलेली ही खेळी आहे, असे बोलले जाते.
विरोधकांकडून एकजुटीचे प्रयत्न - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मोदींच्या किंवा भाजपच्या विरोधात देशभरातील विरोधकांची आघाडी किंवा मोट बांधण्याचा हा कार्यक्रम आहे. याआधी नितीश कुमार येऊन गेले. ममता बॅनर्जींनी अनेक वेगवेगळ्या राज्यातील नेते मंडळींच्या भेटी घेतल्या आहेत.
आघाडी फिस्कटल्याशिवाय राहणार नाही- सगळे सुरू असताना विरोधकांची आघाडी बांधताना या आघाडीचे नेतृत्व नक्की कोण करणार, यावर कोणीही भाष्य करायला तयार नसल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी केली आहे.
ज्या आघाडीचे नेतृत्व निश्चित नाही, त्या आघाडीची मोट कशी काय बांधली जाऊ शकते? उलट दररोज वेगवेगळ्या कारणाने रस्सीखेच होते. त्यामुळे रणनीती काही नाही. त्यांची आघाडी फिस्कटल्याशिवाय राहणार नाही- शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर
हेही वाचा-
- New Parliament inauguration : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनातील फोटो हुकूमशाहीचे प्रतिम मानले जाईल-ठाकरे गट
- Uddhav Thackeray : राज्यात निवडणूक होणारच नाही; असे का म्हणाले उद्धव ठाकरे? घ्या जाणून...
- Arvind Kejriwal Met Uddhav Thackeray : अरविंद केजरीवाल-उद्धव ठाकरेंची भेट; सत्ताधाऱ्यांना विरोधी म्हणा, भाजपवर हल्लाबोल