मुंबई - चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतात शिरकाव केला आहे. मुंबईत कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही रुग्णांना गुरुवारी रात्री पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरुवातीला चीनमध्ये झाला. चीनमध्ये या व्हायरसने आत्तापर्यंत 25 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या व्यतिरिक्त जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका या देशातही काही रुग्ण आढळले आहेत. भारत सरकारच्या निर्देशानुसार या देशातून येणाऱ्या प्रवाशांची देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तपासणी केली जात आहे.
हेही वाचा - 'थॉमस कुक इंडिया'ला ग्राहक मंच न्यायालयाचा दणका! दंडासहित तक्रारदारालाही पैसे देण्याचे दिले आदेश
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरही येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. 18 जानेवारीपासून मुंबई विमानतळावर 1 हजार 739 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. यातील सहा प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. पुढील 28 दिवस हे प्रवासी त्यांच्या घरीच डॉक्टरांच्या निगराणीखाली असतील. यातील दोन प्रवाशांना सौम्य सर्दी, खोकला आणि तापाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोरोना विषाणू हा नवीन आहे. यावर निदान करण्याची व्यवस्था पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) आहे. त्यामुळे संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवले जाणार आहेत.
काय आहे 'कोरोना व्हायरस' -
कोरोना व्हायरस हा विषाणू प्रजातीतील असून उंट, मांजर यासारख्या प्राण्यांच्या माध्यमातून त्याचा प्रसार होतो. ज्या मनुष्याच्या शरीरात हा विषाणू शिरकाव करतो त्याला सर्दी, ताप, खोकल्याची लागण होऊन श्वसनाला त्रास होतो. हा आजार न्यूमोनियासारखा असल्याने यामुळे रुग्णाचे मूत्रपिंड (किडनी) निकामी होण्याची शक्यता असते.