मुंबई - क्राईम ब्रांचकडून एका खासगी गुप्तहेरारा अटक करण्यात आली आहे. नागरिकांच्या मोबाईल सीडीआर, एसडीआर प्रकरणातील गोपनीय माहिती अनधिकृतपणे मिळवण्याच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली असून शहरातील आणखी काही खासगी गुप्तहेरांवर क्राइम ब्रांचची नजर आहे. शैलेश मांजरेकर असे या आरोपीचे नाव आहे.
ग्राहकाला विकली माहिती -
शैलेश हा खासगी गुप्तहेर एजन्सी चालवत असून त्याने गोपनीय सीडीआर, एसडीआरची माहिती त्याच्या ग्राहकाला विकली असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडे मोबाईल सीडीआरचा डेटा, सबस्क्राईब डिटेल्स रेकॉर्ड, लोकेशन व बँक स्टेटमेंट यासंदर्भातील गोपनीय माहिती असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलीस बनले बनावट ग्राहक -
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 5 ला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी बनावट ग्राहक बनवून शैलेश मांजरेकर यांच्याकडे गेले असता अनैतिक प्रेम संबंधांच्या संदर्भात एका व्यक्तीची हेरगिरी करायची असून त्याचे मोबाईल सीडीआर हवे असल्याचा सांगितले. मोबाइल सीडीआर काढून देतो असे सांगत गोरेगावच्या एका मॉलमध्ये पोलिसांना या खासगी गुप्तहेराने बोलावले होते. हा खाजगी गुप्तहेर मोबाईल सीडआरची गोपनीय माहिती घेऊन आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
दिल्लीतून मिळवत होते सीडीआर -
पोलिसांनी या प्रकरणी शैलेशचा साथीदार राजेंद्र साहू या आरोपीलाही अटक केली आहे. दिल्लीतील एका व्यक्तीकडून मोबाईल सिडीआर हा आरोपी घेत होता. या बरोबरच शैलेशला बँकिंग संदर्भातील सर्व गोपनीय माहिती शर्मा नावाची त्याची मैत्रीण देत असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - तब्बल १३ वर्षे 'अनसोल्ड' राहिलेल्या मुशफिकुरची यंदाच्या आयपीएलमधून माघार