मुंबई - विविध गुन्ह्यातील आरोपींना जामिनावर सोडवण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि बनावट जामीनदार देणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. यात आणखी कारवाई करत ही टोळी चालवणाऱ्या रियाज अहमद मुस्ताक अहमद पठाण उर्फ पापा (35) व मुजफ्फर काजी (38) या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
या दोघांच्या अटकेनंतर अटक केलेल्या आरोपींची आकडा आता 12 वर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने बनावट जामीनदार उभे करून गुन्हेगारांची जेलमधून सुटका करणाऱ्या टोळीचा छडा लावला होता. त्या टोळीच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
पोलिसांकडून केलेल्या तपासात या टोळीने गेल्या काही वर्षात 390 गुन्हेगारांसाठी बनावट जामीनदार उभे केले होते. बनावट जामीनदारा देवून या आरोपींची सुटका केली होती. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे सुटका करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बलात्कार गुन्ह्यातील आरोपी , अल्पवयीन मुलींवर शारीरिक अत्याचार करणारे आरोपी , तसेच हत्येचा प्रयत्न करणारे गंभीर गुन्हे असलेले आरोपींचा समावेश आहे. बनावट कागदपत्र व बनावट जामीनदारांमुळे गुन्ह्यातून सुटलेले आरोपी पुन्हा गुन्हा करण्यास मोकळे होत असल्याचे समोर आले आहे.
गेली 2 वर्ष या आरोपींचा हा धंदा बेधडकपणे सुरू होता. यामध्ये न्यायालयातील कर्मचारी सामील आहेत का? याचा तपास आणि गुन्हे शाखा करत आहे. सत्र न्यायालयात आतापर्यंत 150 आरोपींना बनावट कागदपत्रांवर जामीनदार दाखवून सोडवण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे . तर महानगर दंडाधिकारी न्यायालयात जवळपास तीनशे जणांची जामिनावर सुटका या टोळीने केली आहे. हे आरोपी गुन्ह्याचे स्वरूप पाहून 25 ते 40 हजारापर्यंत पैसे घेऊन बनावट जामीनदार देत होते.