मुंबई - रेल्वे पोलिसांनी धावत्या लोकलमध्ये जीवघेणे स्टंट करण्याऱ्या २ अल्पवयीन मुलांचा शोध लावला आहे. त्यांना वडाळा लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. ३ दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील शिवडी रेल्वे स्थानकावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात २ मुले लोकलच्या दारात उभे राहून जीवघेणा स्टंट करत होते.
हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरल्यानंतर वडाळा लोहमार्ग पोलिसांनी स्टंट करणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. रेल्वे पोलिसांतर्फे लोकलच्या दारात थांबू नका कोणतेही स्टंट करू नका. लोकलच्या छतावर चढणे कायद्याने गुन्हा आहे, अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येते. पण, काही अल्पवयीन तरुण काही दिवसांनी स्टंट करतच असतात. त्यामुळे त्यांचा तर जीव धोक्यात जातोच पण इतर प्रवाशांनाही ते संकटात ओढतात त्यामुळे रेल्वे पोलिसांना, अशा स्टंट बाजांमुळे कायम सतर्क राहावे लागते.
वडाळा रेल्वे स्थानक ते मस्जिद रेल्वे स्थानकाकडे ८ मे रोजी अंधेरी येथील १५ वर्षीय २ मुले लोकल रेल्वेच्या दारात उभे राहून स्टंट करत असल्याचे एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये हे दोन्ही अल्पवयीन मुले कधी रेल्वे ट्रॅकच्या बाजूच्या झाडाला स्पर्श करत होते तर कधी विद्युत प्रवाह वाहणाऱ्या खांबाला स्पर्श करत होते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजनुसार मस्जिद स्थानकावर हे २ मुले उतरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तपास करत १२ मे रोजी वडाळा जीआरपी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भा.दं.वि. ३३६ आणि ३४ नुसार कारवाई करून त्यांच्या वडिलांना बोलावून समज देऊन त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
मी सकाळी लवकर कामाला जातो. घरी पत्नी असते ती पण इतर लोकांच्या घरी धुणी-भांडी करण्यासाठी जाते. मुले बाहेर अशा उचापती करतात. त्यामुळे आम्ही पण अशा मुलांपासून हैराण आहोत. मुलांनी असे करायला नको होते. पोलिसांनी आम्हाला समज देऊन मुलांना चांगल्या मार्गाला लावावे, इतरांना धोका तसेच स्वतःलाही धोका होणार नाही याची काळजी घ्या, अशी समज दिल्याचे दोघांपैकी एका मुलाच्या पालकांनी सांगितले.