मुंबई - महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या तीन टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला होता. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबईतील काही व्यावसायिक वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मुंबईकरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. दादर येथील मुंबई बेस्ट्रो या रेस्टॉरंटने जे नागरिक मतदान करून येतील त्यांच्या बिलावर २० टक्के सवलतीची योजना जाहीर केली आहे.
सोमवारी मुंबईत चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या तीन टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला होता. मतदानाचा टक्का वाढावा आणि सुट्टीचा आनंदही लुटता यावा, यासाठी ही योजना राबवत आहे, अशी माहिती मुंबई बेस्ट्रोचे मालक ऋत्वेश घुटवनकर यांनी दिली.
मुंबईमध्ये होणाऱ्या मतदान प्रक्रियेत वाढ व्हावी, यासाठी आम्ही ही सूट दिली आहे. मतदान करून काय होते, असा नकारात्मक विचार करणे सोडून दिले पाहिजे. मतदान हा आपला हक्क आहे, तो बजावला पाहिजे. जे मतदान करून येतील त्यांचे स्वागत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.