मुंबई - वांद्रे येथे झालेली गर्दी आम्ही दिलेल्या बातमीमुळे झालेली नाही. आम्ही प्रसारित केलेल्या बातमीमुळे संबंधित लोक गोळा झाले नसल्याचे स्पष्टिकरण एका वृत्तवाहिनीने दिले आहे. राज्यातील आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराला संबंधित प्रकरणात अटक झाली आहे. यानंतर वाहिनीकडून अधिकृत भूमिका जारी करण्यात आली आहे.
आमच्या चॅनलची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा हा कट आहे. आम्ही अशी कुठलीही माहिती प्रसारित केली नाही ज्यामुळे वांद्रे येथे जमा होण्यास लोक प्रेरित होतील, असे वृत्तवाहिनीकडून सांगण्यात आले आहे. आम्ही दिलेल्या बातमीचा आमच्याकडे पुरावा आणि अधिकृत माहिती आहे, असा दावाही संबंधित चॅनेलने केला आहे.
आमच्या वाहिनीच्या एका पत्रकाराला अटक होणे ही धक्कादायक बाब असल्याचे चॅनेलने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. आम्ही याप्रकरणी कायदेशीर पावले उचलणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. रेल्वे खात्यातील एक अंतर्गत पत्र आमच्या हाती लागले. त्यावर आधारित बातमी आम्ही प्रसारित केली. मात्र, लॉकडाऊन वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयानंतर आम्ही कुठलीही रेल्वे चालणार नसल्याची बातमीही प्रकाशित केली होती, असे स्पष्टिकरण सदर वृत्तवाहिनीने दिले आहे. पत्रकारांना अटक करण्यापूर्वी सर्व तथ्यांची पडताळणी होणे गरजेचे आहे, असेही चॅनेलने म्हटले आहे.
वांद्रे स्थानकावर झालेल्या गर्दीप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तीन एफआयआर दाखल केले आहेत. विनय दुबे, वृत्तवाहिनीचे एक पत्रकार आणि इतरांविरोधात आम्ही कारवाई केली आहे, अशी माहिती डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.