मुंबई - आरे जंगलातील झाडांच्या कत्तलीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लॉकडाऊनच्या काळात आरे युनिट 13 मध्ये 30 ते 35 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तर, त्या जागेवर अनधिकृत झोपड्या वसवल्या जात आहेत. याविरोधात तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने वनशक्ती संस्थेने आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 कारशेड आणि झाडांच्या कत्तलीचा वाद मोठा आहे. अशात आता लॉकडाऊनचा फायदा घेत काही झोपडपट्टी माफियांनी आरे युनिट 13 मध्ये झाडांची कत्तल सुरू केली आहे. जवळपास 30-35 झाडांचा बळी घेत त्या जागी झोपड्या वसवल्याची माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली आहे. याबाबत संबंधित यंत्रणांकेडे तक्रार करूनही दुर्लक्ष झाले. त्यामुळे, आपण न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मेट्रो-३ आणि इतर प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर आरे जंगल नष्ट केले जात आहे. त्यामुळे, मुंबईच्या पर्यावरणाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. त्यात अशी आणखी बेकायदा झाडांची कत्तल झाली, तर जंगल पूर्ण नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे, आम्ही न्यायालयीन लढाई सुरू केल्याचेही स्टॅलिन यांनी सांगितले आहे. तर आता या याचिकेच्या सुनावणीकडे सर्व पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.