मुंबई - कोरोनाची संभाव्य दुसरी लाट लक्षात घेता आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आज दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातहून रेल्वेने परतलेल्या प्रवाशांची दादर रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी करण्यात आली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसेच 25 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असेल तरच महाराष्ट्रात प्रवेश मिळणार असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. विमान, ट्रेन आणि रोडने येणाऱ्या सर्व प्रवाशांना हा कोरोना चाचणी करण्याचा नियम लागू असेल, असेही सरकारकडून सांगण्यात आले. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भात एक परिपत्रक २३ नोव्हेंबरला जारी केले आहे.
म्हणून घेतला निर्णय -
मुंबईसह राज्यात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जून नंतर काही प्रमाणात लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आली. धार्मिक सण, दिवाळी यानंतर पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी दिल्ली मुंबई विमान सेवा बंद करावी तसेच राज्याबाहेरून येणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाड्यांवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. यावेळी मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे बनवण्याची गरज असल्याचे म्हटले होते. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी येत्या आठ ते दहा दिवसांत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. तर रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसारखा निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असे म्हटले होते.
हेही वाचा -'लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही'
हेही वाचा -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बीएमसी सज्ज