मुंबई - मागील पाच दिवसांपासून सलग कोसळत असलेल्या पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. पावसाने आज विश्रांती घेतल्यानंतर लोकलच्या सेवा आज रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवण्यात येत आहेत. यातच रेल्वे डब्यातील गर्दीमध्ये श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एका युवतीला घाटकोपरला उतरून जवळच्या राजावाडी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. वैशाली भानुशाली असे त्या युवतीचे नाव आहे.
लोकलमधे गर्दी असल्याने श्वास घेण्यास प्रवाश्यांना त्रास होत आहे. आज सकाळी डोंबिवली येथून वैशाली भानुशाली ही सीएसटीमच्या दिशेने जात होती. यावेळी तिला डब्यात श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला. जीव गुदमरल्याने तिला घाटकोपरच्या जलद प्लॅटफॉर्म आल्यावर तिच्या मैत्रिणींनी रेल्वे पोलिसांना फोन करून मदत मागितली. या ठिकाणाहून तिला रुग्णवाहिकेद्वारे राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. राजावाडी रुग्णलयाच्या आणि रेल्वेच्या सुविधेवर वैशालीच्या मैत्रिण रूपा शाह यांनी नाराजी व्यक्त केली. वैशाली ही घाटकोपर येथे मार्केटिंगचा जॉब करते.