मुंबई - राज्य शासनाने 2 जुलैला शहरातल्या शहरात 10 पोलीस उपयुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र, दोन दिवसानंतर या बदल्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना अगोदरच्या ठिकाणी पुन्हा रुजू होण्यास सांगण्यात आल्याने मुंबई पोलीस दलात गोंधळ उडाला आहे. या प्रकारामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नक्की काय चाललंय? अशी चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.
2 जुलै रोजी गृह मंत्रालयातून काढण्यात आलेल्या आदेशात मुंबईत पोलीस खात्याचे प्रवक्ते पोलीस उपायुक्त अशोक प्रणय यांची बदली करुन त्यांना झोन 5 ची जबाबदारी देण्यात आली होती. झोन 7 चे पोलीस उपायुक्त परमजीत दाहिया यांना झोन 1 ला पाठवण्यात आले होते, तर झोन 1 च्या पोलीस उपायुक्तांना मुंबई पोलिसांच्या अभियान विभागात प्रवक्ते पदी नियुक्त करण्यात आले होते. उपायुक्त प्रशांत कदम यांना झोन 7 ला पाठवण्यात आले होते तर गणेश शिंदे यांना पोर्ट झोनची जबाबदारी देण्यात आली होती.
पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांना पोर्ट झोनमधून सायबर विभागात नेमण्यात आले होते. क्राईम ब्रँचचे शहाजी उमाप यांना स्पेशल ब्रँच 1 ला पाठवण्यात आले होते तर, मोहन दहिकर यांना क्राईम ब्रँच उपायुक्त म्हणून नेमण्यात आले होते. विशाल ठाकूर यांना झोन 6 तर नंदकुमार ठाकूर यांना मुख्यालय 1 ला पाठवण्यात आले होते. मात्र, या बदल्या झाल्यानंतर दोन दिवसानंतर अचानक या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून याबद्दलची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या बदल्या मुख्यमंत्री कार्यालय व त्यांच्या विभागाकडून रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. अचानक हा निर्णय का घेण्यात आला याबद्दल कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.