नवी मुंबई - ट्रान्सहार्बर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकात ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेलच्या दिशेने जाणारी लोकलसेवा सुमारे दोन तास खोळंबली. ही लोकल कोपर खैराणे येथील कारशेडमध्ये नेण्यात आल्यानंतर या मार्गावरील लोकलसेवा पूर्ववत झाली. या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणारी लोकल सकाळी ६:४६ वाजण्याच्या सुमारास ऐरोली रेल्वे स्थानकात आल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली. जवळजवळ दोन तास ही लोकल ऐरोली स्थानकात थांबून होती. लोकल थांबल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आल्याने अनेक प्रवासी या लोकलमधून खाली उतरले. या प्रकारात दोन ते तीन तास गेल्याने ठाण्याहून पनवेलला जाणाऱ्या मार्गावरील सर्व लोकल अडकून पडल्या. या मार्गावरील लोकलसेवा खोळंबल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील दोन्ही बाजूंची लोकलसेवा विस्कळीत झाली. दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास या दोन्ही मार्गावरील लोकससेवा सुरू करण्यात आली. तांत्रिक बिघाड झालेली लोकल ही कोपरखैरणे येथील कारशेडमध्ये नेण्यात आली. ऐन ऑफिसला जाण्याचा वेळेत लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवासी वर्ग मेटाकुटीला आले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकातून उतरून खासगी वाहन किंवा बसने ऑफिस गाठताना प्रवाशांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली होती. सद्यस्थितीत ठाणे ते पनवेल मार्गावरील रेल्वे वाहतून पूर्वपदावर आली असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले.