मुंबई - मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज मुंबईत थैमान घातले आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे रूळ, शाळा, घरे, रेल्वे स्थानके आदी ठिकाणी पाणी भरलेले आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
राज्य शासनाने पावसामुळे शाळांना सुट्टी दिलेली आहे. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरातील रेल्वे पूर्णपणे ठप्प झालेली आहे. सकाळी घरातून कार्यालयात निघालेले चाकरमानी वाहतूक व्यवस्था ठप्प असल्यामुळे व अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे अडकून पडलेले आहेत.
काल रात्रीपासूनच पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रात्रीपासूनच मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व हार्बर या सर्व ठिकाणच्या रेल्वे ठप्प झाली आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरच पाणी साचलेले आहे. त्यामुळे ही वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. राज्य शासनाकडून व पालिका प्रशासनाकडून नागरिकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.