मुंबई - मनातील वाईट विचारांना जाळून राख करावी, या कल्पनेतून होळी उभारली जाते. मुंबईतही गल्लोगल्लीत होळी जाळून वाईट सवयींना सोडण्याचा संकल्प करण्यात येतो. येथील वरळी, चेंबूर, माहीम, वर्सोवा, खारदांडा येथील कोळीवाड्यात पारंपारिक वातावरणात होळी साजरी केली जाते. कोळीवाड्यासह अन्य भागातही होळीचा उत्साह दिसून आला. तसेच माहीम कोळीवाड्यात होळीसह पारंपरिक सण टिकले पाहिजे, असा सामाजिक संदेशही देण्यात आला.
माहीम कोळीवाड्यात होळीचा एक वेगळा प्रकारचा माहोल असतो. प्रत्येक गल्लीत उंच होलिका उभारण्यात येते. ३ दिवस हा सण धामधुमीत साजरा केला जातो. होळीच्या एक दिवस आधी सुपारीच्या झाडाचे खोड होळीसाठी पारंपारिक वाद्यांनी आणले जाते. त्यानंतर हळद लावली जाते. आंघोळही घातली जाते. साडी नेसवून नटवले जाते. देवीचा मुखवटा चढवून झाल्यावर होलीका भोवती महिलांचे नृत्य होते.
हेही वाचा -होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त, तळीरामांवर अंकुश ठेवण्यासाठी नाकेबंदी
माहीम कोळीवाड्यात गेल्या ५० वर्षांपासून स्थायिक असलेले रहिवाशी नाईक यांनी येथील होळी उत्सवाबद्दल माहिती दिली. 'होळी माता ही आम्हा कोळी बांधवांना सांभाळणारी माता आहे. वर्षभरात जर काही वाद झाले, तर ते विसरून आम्ही या होळीच्या माध्यमातून एकत्र येतो. रात्रभर हा सण साजरा करतो. सकाळच्या वेळी होळी पेटवण्यात येते. त्यानंतर समुद्रात नेऊन तिचे विसर्जन केले जाते', असे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -खेलो होली ईको फ्रेंडली..! विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रशिक्षण