मुंबई - कोरोना संकट काळात अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तशीच परवानगी मेडिकल आणि किराणा स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही देण्यात यावी, अशी मागणी रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने केली आहे.
लोकल प्रवासास असलेली बंदी, कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी ग्राहकांनी फिरविलेली पाठ, कारागिरांना द्यावा लागणारा महिन्याचा पगार, अशा एक ना अनेक प्रश्नांचा कात्रीत मुंबईतील दुकानदार आणि व्यापारी अडकले आहेत. मागील सहा महिन्यांपासून निरंतर किराणा, मेडिकल स्टोअर्स, अत्यावश्यक सेवा देणारे कामावर येत आहेत आणि मुंबईकरांना सेवा देत आहेत. बेस्ट बसेसवर ताण आणि प्रचंड गर्दी यामुळे सामाजिक अंतर राखले जात नाही आणि सुरक्षित अंतर न राखल्यामुळे कोरोना पसरण्याची भीती आहे. अशात प्रवास करुन मेडिकल आणि किराणा स्टोअरमध्ये काम करणारे कर्मचारी कामावर येत आहेत.
बेस्ट बसेसमधील गर्दी कमी करण्यासाठी, आवश्यक सेवा प्रदान करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसारखी लोकल रेल्वे वापरण्याची परवानगी मेडिकल आणि किराणा स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने केली आहे. शासनाने आरोग्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी, प्रेस वार्ताहर, पत्रकार यासारख्या अत्यावश्यक सेवा कर्मचार्यांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे सर्वच कारभार ठप्प झाला आहे. सद्यघडीला अर्थचक्र खोळंबल्याने अर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाने मुंबईतील दुकाने खुली करण्यास परवानगी दिली. परंतु व्यापाऱ्यांचा अजूनही आर्थिक परिस्थितीशी संघर्ष सुरूच आहे.
हेही वाचा - ठरलं! पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचेच; सदस्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक
हेही वाचा - बंदी घातलेले चिनी अॅप वापरतो महाराष्ट्र भाजप, सचिन सावंत यांचा आरोप