मुंबई - 'मोदीजी आपने हमारे बच्चो की व्हॅक्सिन विदेश क्यों भेजी', असे पोस्टर दाखवत मुंबई काँग्रेस आंदोलन करणार आहे. लसीकरण केंद्र आणि मुंबईतील बाजाराच्या ठिकाणी मानवी साखळी तयार करून हे आंदोलन केले जाणार आहे.
उद्या उत्तर मुंबईतून होणार आंदोलनाला सुरूवात -
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसकडून मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती. या पोस्टरच्या माध्यमातून 'मोदीजी आपने हमारे बच्चो की व्हॅक्सिन विदेश क्यों भेजी', अशी टीका करणारे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर भाजपकडून हे पोस्टर हटवण्यात आले. मात्र, आता याच मुद्द्यावर मुंबई काँग्रेसकडून लसीकरण केंद्र आणि मुंबईतील बाजाराच्या ठिकाणी मानवी साखळी करून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली. उद्या उत्तर मुंबईतून या आंदोलनाला सकाळी 10 वाजता सुरवात होणार आहे.
देशातील सद्यस्थितीला मोदी जबाबदार -
जगभरात कोरोनाची पहिली लाट असताना आपल्या देशात लस तयार झाली होती. ही लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 93 देशांना विकली. उत्पादन झालेली लस जर विकल्या गेल्या नसत्या, तर देशातील नागरिकांचे लसीकरण झाले असते. आज देशात ही परिस्थिती उद्भवली नसती. त्यामुळे सध्या देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोपदेखील यावेळी भाई जगताप यांच्याकडून करण्यात आला.
हेही वाचा - चिमुकलीसह आईची विहिरीत आत्महत्या; पती, सासू-सासरा, नणंद विरोधात गुन्हा दाखल