मुंबई - सोमवारपासून (२६ ऑगस्ट) काँग्रेस 'महापर्दाफाश' सभांचा शुभारंभ करणार आहे. या सभांच्या माध्यमातून फडणवीस सरकारच्या 'महाजनादेश' यात्रेची 'पोलखोल' करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
सोमवारी अमरावतीमधून महापर्दाफाश सभांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या सभेसाठी गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. या सभांच्या माध्यमातून काँग्रेस भाजपने दिलेल्या खोट्या आश्वासनांची पोलखोल करणार आहे. राज्यात काही ठिकाणी भयंकर दुष्काळ आहे. तर काही ठिकाणी महापूरासारख्या आपत्तीत अनेकजण सापडले आहेत. आपत्तीग्रस्त जनतेला वाऱ्यावर सोडून पुन्हा निवडून यायचेच, असा चंग बांधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरु केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. अमरावती येथे पहिली महापर्दाफाश सभा होणार आहे. अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात विविध ठिकाणी महापर्दाफाश सभा होणार आहेत. पुढच्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , कोकण- मुंबई या विभागात सभा होणार आहेत.