मुंबई - आजपासून नवे आर्थिक वर्ष लागू झाल्यामुळे अनेक गोष्टी महागल्या आहेत. याचाच फटका आता मुंबईकरांना बसणार आहे. आजपासून राजीव गांधी सागरी सेतू अर्थात वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे 15 ते 30 रुपयांनी टोल वाढला आहे. त्यानुसार आता वाहन चालकांना 85, 130 आणि 175 रुपये एवढा टोल प्रतिफेरी भरावा लागेल. हे नविन दर पुढील ३ वर्षांसाठी लागू असतील.
वांद्रे-वरळी सी लिंक प्रवास महागला -
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकार क्षेत्रात वांद्रे-वरळी सी-लिंक येतो. वाहनचालकांना सुविधा आणि सुरक्षा पुरवण्यासाठी दर तीन वर्षांनी टोल आकारात वाढ करण्याची राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सी-लिंकवर आणखी 31 वर्षे म्हणजेच 2052 पर्यंत टोल वसुली करता येणार आहे. 1 एप्रिलपासून अर्थात आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार लहान वाहनांच्या टोलसाठी 15 रुपये, मध्यम वाहनाच्या टोलसाठी 20 रुपये आणि अवजड वाहनांसाठी 30 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे मासिक पासमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वांद्रे-वरळी सी लिंकवरून जाताना वाहन चालकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.
असे आहेत नवीन दर -
मिळालेल्या माहितीनुसार कार, जीप व इतर तत्सम वाहने (चालक वगळून 12 प्रवासी क्षमता असलेली), वाहनचालक वगळून सहा आसनी प्रवासी रिक्षांसाठी 85 रुपये प्रतिफेरीसाठी टोल द्यावे लागणार आहे. तर मिनी बस किंवा तत्सम वाहने (चालकवगळून12 पेक्षा जास्त पण 20 प्रवासी क्षमतेपर्यंत) आणि मालवाहतूक करणारी वाहने यांना 130 रुपये द्यावे लागणार आहे. तर ट्रक आणि बस या वाहनांसाठी प्रतिफेरीसाठी 175 रुपये द्यावे लागणार आहे.