मुंबई - नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, अशा एकुण 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे...काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांना सरकारी बंगला सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत... यासह राज्य आणि देशातील महत्वाच्या १० बातम्या वाचा एका क्लिकवर..
नागपूर - येथील मध्यवर्ती कारागृहातील दहा जणांना कोरोना झाल्याचे मंगळवारी (दि. 30 जून) निष्पन्न झाले होते. त्यानंतर बुधवारी (दि. 1 जुलै) आणखी 44 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. आज कोरोनाबाधित आढळलेल्यामध्ये मध्यवर्ती कारागृहाचे काही कर्मचाऱ्यांसह त्यांचे काही कुटुंबियही कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मिळून दोन दिवसात 54 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
वाचा सविस्तर - धक्कादायक..! नागपूर मध्यवर्ती कारागृहातील 54 अधिकारी, कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
अमरावती - धारणी शहरापासून 32 किमी अंतरावर असणाऱ्या बैरागड गावात सिलिंडरचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. या स्फोटात दोन भावांच्या घरांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. शेख शेरे अफगाण यांच्या घरात सिलींडरचा स्पोट होऊन शेख चाँद, शेख शेरे अफगाण या दोन्ही भावांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
वाचा सविस्तर - धक्कादायक; मेळघाटातील बैरागडमध्ये सिलिंडरचा स्फोट, दोन भावांच्या घरांचे नुकसान
नागपूर - शहरातील शिवसैनिकांवर खंडणी वसूल करत असल्याचे आरोप लागायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या युवा नेत्यांवर सध्या नागपुरात गुन्हे दाखल होत आहेत. युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांनी एका फायनान्स कंपनी मालकाकडे 8 लाख रुपयांची खंडणी मगितल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता शिवसेनेच्या शहर प्रमुखांवर धमकावून खंडणी मागणे, संपत्तीवर अवैध कब्जा करणे, ती रिकामी करण्यासाठी पुन्हा खंडणी मागणे, दुकान आणि फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात फसवणूक करणे असे अनेक आरोप लावण्यात आले आहेत.
वाचा सविस्तर - खंडणी आणि फसवणूक प्रकरणी शिवसेनेच्या नेत्यावर नागपुरात गुन्हा दाखल
मुंबई - एकीकडे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. तरीही प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या भाजप सरकारद्वारे इंधनाच्या किंमतीत अमर्याद वाढ केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी मुलुंड येथील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पेट्रोल पंपावर प्रधानमंत्री मोदींच्या छायाचित्रास लाडू भरवण्यात आले.
वाचा सविस्तर - ...म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भरवले मोदींच्या छायाचित्राला लाडू
नवी दिल्ली - भारत-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील लष्कराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी पूर्व लडाखचा दौरा करण्याची शक्यता आहे. गलवान व्हॅलीतील धुमश्चक्रीनंतर सीमेवर अजूनही तणाव आहे. हा तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच नियंत्रण रेषेवर अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा कुटिल डाव चीनकडून सुरू आहे.
वाचा सविस्तर - भारत-चीन सीमावाद : संरक्षण मंत्री शुक्रवारी लडाखला भेट देण्याची शक्यता
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मंडळाने यावर्षी गणेशोत्सवाऐवजी आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे.
वाचा सविस्तर - 'गणेशोत्सव नव्हे तर यंदा आरोग्य उत्सव'; लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांना सरकारी बंगला सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये असलेले हे सरकारी निवासस्थान सोडण्यासाठी त्यांना एक ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
वाचा सविस्तर - प्रियांका गांधींना सरकारी घर सोडण्याचे आदेश; एक ऑगस्टपर्यंत मुदत
नवी दिल्ली - पतंजलीने तयार केलेल्या कोरोनिल औषधावर आयुष मंत्रालयाची कोणतीही बंधने नसून औषध लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असे आज(बुधवार) योगगुरू रामदेव बाबा यांनी हरिद्वारमध्ये पत्रकार परिषद घेत सांगितले. पतंजली या औषधाला कोरोना आजारावरील व्यवस्थापनासाठीचे औषध, असे म्हणत आहे. मात्र, यावरून हे औषध नक्की कशासाठी आहे, असा संभ्रम ग्राहकांमध्ये होऊ शकतो.
वाचा सविस्तर - पतंजली कोरोनिल औषध बाजारात विकू शकते, पण...
हैदराबाद : कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड होत असलेल्या बऱ्याच बातम्या आपण ऐकत आहोत. कर्नाटकातही एका वृद्ध महिलेच्या मृतदेहाला चक्क जेसीबीच्या सहाय्याने अंत्यविधीसाठी नेण्यात आल्याची घटना याच आठवड्यात घडली. मृत व्यक्तींच्या देहाची होत असलेली ही विटंबना म्हणजेच भारतीय संविधानाच्या कलम २१चे उल्लंघन आहे. हे कलम जीविताचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी या कलमांतर्गत देण्यात येते.
वाचा सविस्तर - कोरोना मृतदेहांची हेळसांड; मृत व्यक्तींचे काय आहेत अधिकार?
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने प्रशासनास अत्यल्प खर्च होत आहे. तरीही शाळा मात्र शुल्क वसुलीचा तगादा लावत पालकांना हैराण करून सोडत आहेत. त्यामुळे देशात कारोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जावेत, आदी मागण्यासाठी महाराष्ट्रासहित देशभरातील आठ राज्यांचे पालक एकवटले आहेत. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 6 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील ऍड. सिद्धार्थ शर्मा यांनी सांगितले.
वाचा सविस्तर - कोरोना काळात शाळांच्या शुल्क माफी हवी; आठ राज्यांचे पालक सर्वोच्च न्यायालयात