मुंबई : मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज तीन महत्त्वाच्या बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि अभिनेते यांच्या संदर्भात सुनावणी होणार आहे. मुंबईच्या अंधेरी उपनगरामध्ये सलमान खान सायकलवर फिरत असताना एका पत्रकाराने बातमीच्या अनुषंगाने त्याचा व्हिडिओ काढला, त्याच वेळी सलमान खानने त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्या पत्रकाराला शिवीगाळ केली. या प्रकारचा आरोप करत पोलिसात त्या पत्रकाराने तक्रार दिली होती. नंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील याबाबत याचिका दाखल केली होती. त्या अर्जावर आज न्यायमूर्ती भारतीय डांगरे यांच्या खंडपीठांसमोर ही सुनावणी होणार आहे. याआधी मुंबईच्या न्याय दंडाधिकारी यांनी पत्रकाराने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर सलमान खानला समन्स बजावलेले होते. मात्र त्या समन्सवेळी सलमान खान हजर नव्हता. म्हणून आता उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात प्रकरण सुनावणीसाठी निश्चित केले गेले आहे.
आर्थिक गैरव्यवहार : नवाजउद्दीन सिद्दीकीची पत्नी आणि त्याचा लहान सख्खा भाऊ यांच्या संदर्भातली देखील महत्त्वाची सुनावणी याच खंडपीठांसमोर होणार आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी याने आपला लहान भाऊ आणि त्याची पत्नी यांना आर्थिक व्यवहार करण्यासंदर्भात अधिकार दिला होता. मात्र लहान भावाने नवाजउद्दीन सिद्दीकीच्या नावे अनेक आर्थिक गैरव्यवहार केला, असे नवाजउद्दीन सिद्दीकीने आपल्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे भाऊ आणि पत्नी यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा दावा दाखल केलेला आहे.
कर चुकवल्याबाबत नोटीस : प्रख्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला 2021 मध्ये महाराष्ट्र विक्रीकर विभाग यांनी मूल्यवर्धित कर प्रणाली अर्थात व्हॅट या अंतर्गत सलग दोन वर्षाचा कर चुकवल्याबाबत नोटीस पाठवली होती. त्यानंतर अनुष्का शर्मा हिने आपल्याला कोणतीही सूचना किंवा काहीही न कळवता नोटीस बजावली. म्हणून तिने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दोन महिन्यापूर्वी याचिका दाखल केल्या होत्या. तिने आपल्या याचिकेमध्ये नमूद केलेले आहे की, चित्रपटाचा मालक हा निर्माता असतो. ती काही मालक नाही. त्याच्यामुळे तिला कोणत्या तरतुदी अंतर्गत अशा प्रकारच्या नोटीस पाठवली आहे. मात्र याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या खंडपीठाने त्यावेळी सुनावणीस नकार दिला होता. म्हणून आता अनुष्का शर्मा हिने दोन स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आहेत. महाराष्ट्र विक्रीकर विभागाच्या नोटीसला त्यांनी आव्हान दिलेले आहे. या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.