मुंबई - राज्य पोलीस दलात गेल्या 24 तासात 3 कोरोनाग्रस्त पोलीस अधिकारी आढळून आले. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही कोरोनाबाधित 1 हजार 396 पोलिसांवर उपचार सुरू असून, यात 191 पोलीस अधिकारी तर 1 हजार 205 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोना योद्ध्यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे गंभीर बाब मानली जात आहे. तसेच काही पोलीस कर्मचारी हे बरे झाल्यानंतर पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.
लॉकडाउन कालावधीतील गुन्ह्यांची नोंद -
लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 26 हजार 100 गुन्हे नोंदविण्यात आले असून मुंबई वगळता क्वारंटाईन नियम मोडणाऱ्या 725 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 263 घटना घडल्या असून या प्रकरणी आतापर्यंत 846 जणांना अटक करण्यात आलेली आहे. कोविड-19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 1 हजार 499 कॉल पोलीस नियंत्रण कक्षाकडे आले असून अवैद्य वाहतुकीच्या 1333 प्रकरणात 24034 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 80950 वाहन जप्त करण्यात आली असून तब्बल 6 कोटी 97 लाख 67 हजारांचा दंड पोलिसांनी थोटावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 49 घटना घडल्या असून 86 पोलीस हे जखमी झाले आहेत.
सायबर विभागाची कारवाई -
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये सोशल माध्यमांचा वापर काही गुन्हेगार व समाजकंटक हे जातीय तेढ निर्माण करून अफवा पसरविण्याचा प्रयत्न करीत असून अशा प्रवृत्तीच्या विरोधात राज्याच्या महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात लॉकडाऊन काळात सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात ४६४ गुन्हे दाखल झाले असून २५४ व्यक्तींना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९२ गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत, ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर ऑडिओ क्लिप्स, युट्यूबचा गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५४ आरोपींना अटक केली आहे.