मुंबई - मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 12 ने दुधात भेसळ करून विकणार्या तीन आरोपींना अटक केली आहे. दिंडोशी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत केलेल्या कारवाई या आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये आरोग्यास हानीकारक अस्वच्छ पाणी मिसळून ते बाजारात विकणार्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीवरुन केली कारवाई..
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती. यावरुन 28 ऑक्टोबरला कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह गोरेगाव पूर्व येथील ओमकार चाळ, शिवाजी नगर याठिकाणी छापा मारून तपासणी केली असता त्या ठिकाणी काही इसम हे नामांकित गोकुळ फुल क्रीम व अमूल ताजा या कंपन्यांच्या मूळ पिशव्या कात्रीने कापून त्यामध्ये भेसळ करताना आढळून आले होते. पोलिसांनी या आरोपींकडून 31 हजार रुपयांचे 603 लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले असून राम कृष्ण चंद्रया बंडापल्ली, महेश चंद्रया बंडापल्ली व सुरेश गुणकारी या आरोपींना अटक केली आहे.