मुंबई - अभिनेत्री उर्फी जावेद तसेच भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यातला वाद काही कमी होताना दिसत नाही. उर्फी जावेद हिचा नंगानाच मुंबईच्या, महाराष्ट्राच्या रस्त्यावर आपण चालू देणार नाही. उर्फी जावेद जिथे दिसेल तिथे आपण तिला चोप देऊ असं थेट प्रसारमाध्यमांसमोर येऊन चित्रा वाघ यांनी वक्तव्य केलं होतं. गेल्या काही दिवसापासून उर्फी जावेद तिच्यावर चित्रा वाघ प्रचंड चिडल्या आहेत.
महिला आयोगाकडे रीतसर तक्रार करणार - उर्फी जावेद अश्लील कपडे परिधान करून महाराष्ट्राच्या संस्कृतीची लक्तरे काढत असल्याचं चित्रा वाघ यांचं म्हणणं आहे. मात्र चित्रा वाघ यांनी थेट प्रसारमाध्यमावर आपल्याला मारहाण करण्याची धमकी दिली असा आरोप उर्फी जावेदने केला आहे. आज मुंबईत उर्फी जावेदने महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना माहिती दिली आहे. उर्फी जावेद हिने अजून महिला आयोगाकडे रीतसर तक्रार केलेली नाही. मात्र लवकरच या सर्व प्रकरणात आपण महिला आयोगाकडे ऑनलाईन तक्रार करू असं उर्फी जावेद हिने रूपाली चाकणकर यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.
उर्फी जावेदच्या जीवाला धोका - उर्फी जावेद हिच्यावर महिला आयोगाने अश्लील कपडे परिधान करत असल्यामुळे कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ गेल्या अनेक दिवसापासून करत आहे. मात्र त्याच महिला आयोगाकडे आता उर्फी जावेद हिने मारहाण करणार असल्याने आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. यासोबतच उर्फी जावेद हिने चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलिसात देखील रिचार्ज तक्रार दाखल केली आहे.
उर्फी जावेद हिला मारहाण करण्याची धमकी - तिथेच उर्फी जावेद हिचे वकील नितीन सातपुते यांनीही चित्रा वाघ यांनी सार्वजनिक ठिकाणी उर्फी जावेद हिला मारहाण करण्याची धमकी दिली आहे. चित्रा वाघ या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची धमकी दिल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक होऊ शकतात. ते कार्यकर्ते देखील उर्फी जावेद हिच्यावर हल्ला करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे उर्फी जावेद हिला काही झालं तर चित्रा वाघ जबाबदार असतील असं नितीन सातपुते यांनी सांगितला आहे.
कपडे परिधान करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य - चाकणकर अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद यांनी आज आपली भेट घेऊन आपल्याला मारहाण होण्याची शक्यता व्यक्त केली असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितला आहे. तसेच कोणी कोणते कपडे परिधान करावे हा जाता त्याचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे याबाबतीत कोणीही ढवळाढवळ करू नये असे देखील रूपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.
आपण कोणालाही घाबरत नाही - उर्फी जावेद हिने महिला आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन आपल्यावर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र उर्फी जावेत हिने अश्लील कपडे परिधान करून महाराष्ट्रात नंगा नाच सुरू ठेवला आहे. या नंगानाचा विरोधात आपली भूमिका आहे. उर्फी जावेद यांचा कोणताही वैयक्तिक विरोध नाही. त्यामुळे उर्फी जावेद यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली असली तरी, आपण कोणालाही घाबरत नाही असा इशारा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद रूपाली चाकणकर यांना दिला आहे.