मुंबई - बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या एमसीएचआय-क्रेडाय संघटनेने भारतीय जैन संघटनेच्या मदतीने सुरू केलेल्या मोबाईल व्हॅन दवाखान्याचा मोठा फायदा होत आहे. 19 मोबाईल दवाखान्याच्या माध्यमातून 15 दिवसांत 33 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तर यातून 884 संशयित रुग्ण शोधत त्यांना मुंबई महानगरपालिका आणि सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
भारतीय जैन संघटनेकडून देशभरात मोबाईल दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. तर मुंबईत या संघटनेला एमसीएचआय-क्रेडायची साथ मिळाली आहे. 15 दिवसांपूर्वी डॉक्टर आपल्या दारी म्हणत पालिकेच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल दवाखाना सुरू करण्यात आला. 19 मोबाईल दवाखान्याच्या माध्यमातून जी-साऊथ, जी-नॉर्थ, एफ नॉर्थ, मुलुंड, घाटकोपर, भांडुप, पवई, मीरा-भाइंदर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ या भागामधील रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत 33 हजार नागरिकांची तपासणी करत त्यातून 884 संशयित रुग्ण शोधत पुढील धोका कमी करण्याचे काम केले आहे.
२० डॉक्टरांनी अहोरात्र मेहनत घत रुग्णसेवा दिली आहे. दरम्यान देशात भारतीय जैन संघटनाकडून 171 मोबाईल दवाखान्याद्वारे १ एप्रिल ते आतापर्यंत ५ लाख ११ हजार १३० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तर ६ हजार, ६८ रुग्णांना संशयित रुग्ण शोधण्यात आले आहेत.