मुंबई - देशाची आर्थिक राजधानी अमली पदार्थ रॅकेटचे प्रमुख केंद्र बनत चालली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत गांजा, एमडी सारख्या अमली पदार्थांची तस्करी वाढल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण पिढी अमली पदार्थांचे अधिक सेवन करीत असल्याचेही पोलिसांच्या करवाईवरून दिसून येत आहे. 2019 मध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या एकूण कारवाई दरम्यान अमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात एकूण 11 हजार पाचशे 72 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
हेही वाचा - अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बदनामीच्या भीतीने मुलीने घेतले उंदीर मारायचे औषध
अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी आरोपींची सख्याही हजाराच्या घरात आहे. एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या 11 हजार नऊशे 86 असून, जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचे एकूण प्रमाण 714 किलो आहे. आंतराष्ट्रीय बाजारात याची 62 कोटी रुपये किंमत असल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे 2019 मध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाई दरम्यान एकूण 70 गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईत एकूण 103 आरोपी अटक करण्यात आले असून, जप्त अमली पदार्थांचे एकूण प्रमाण हे 394 किलो आहे. आंतराष्ट्रीय बाजारात या जप्त मालाची किंमत 25 कोटीहून अधिक असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर मुंबईत सतर्क असलेले ड्रग पेडलर दिल्लीसह देशातील इतर मोठ्या शहरात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी नेट बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करतात. अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचेही समोर येत आहे. कोकेन, हेरॉईन, केटामाईन सारख्या अमली पदार्थांची किंमत अधिक असल्याने तरुण पिढी इतर स्वस्त व सोप्या पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या अमली पदार्थांच्या आहारी गेली आहे. गेल्या काही महिन्यात अमली पदार्थ तस्करांवर केलेल्या कारवाईत गांजा व एमडी सारख्या अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाल्याचे पोलिसांच्या कारवाईतून दिसून येत आहे.
हेही वाचा - दोन आठवड्यात 4 सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 17 मुलींची सुखरूप सुटका