मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ट्विटर वरून दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये सामील झालेल्या तबलिगी सदस्यांना त्यांच्या प्रवासाचा तपशील मुंबई महानगर पालिकेच्या 1916 या संपर्क क्रमांकावर देण्याचे आदेश दिले आहेत.
एखादी व्यक्ती तिच्या प्रवासाचा तपशील देण्याचे टाळताना आढळून आल्यास मुंबई पोलिसांकडून आयपीसी, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग कायद्याअंतर्गत कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही मुंबई पोलीस आयुक्तांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील धारावी परिसरात एका 56 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या संदर्भात मृत व्यक्ती ही दिल्लीतून निजामुद्दीन येथे मरकजच्या कार्यक्रमात शामिल झालेल्या व धारावी परिसरात 4 वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या 10 व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. अशा व्यक्तींचा मुंबईत शोध घेण्याच काम मुंबई पोलीस करीत आहेत.
मुंबई शहरात संचार बंदी करण्यात आली असून कलम 144 लागू करण्यात आला आहे. असे असतानाही मुंबईत संचार बंदीचा कायदा मोडणाऱ्या 1970 जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली असून , 144 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 299 आरोपीना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले असून तब्बल 1527 जणांना जामिनावर सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात मुंबई शहरात कलम 188 नुसार 63 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे , अवैध वाहतूक प्रकरणी दक्षिण मुंबईतून 9 गुन्हे , मध्य मुंबईतून 6 , पूर्व मुंबईत 21 , पश्चिम मुंबईत 3 व उत्तर मुंबईत सर्वाधिक 24 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.